प्रेमासाठी माणसे काय वाटेल ते करतात, असे म्हण्याची पद्धत आहे. बिहारच्या मुंगेर या शहरात याच प्रेमापोटी एक विचित्र घटना काही दिवसांपूर्वी घडली. मोना कुमारी नामक महिलेचे लग्न झाले. लग्नानंतर सात दिवसांनी ती आपल्या पतीबरोबर बाजारात गेली होती. तिथे तिला तिचा प्रियकर दिसला आणि ती सरळ पतीचा हात सोडून, प्रियकराचा हात धरुन पळून गेली. अर्थात तिचे हे कारस्थानच होते, हे नंतर स्पष्ट झाले. बांगडय़ा खरेदी करायच्या आहेत, असे सांगून तिने घरातून बाहेर जाण्याची अनुमती मागितली. मात्र, पतीने तिला एकटीला सोडण्यास नकार दिला. तो स्वतः तिच्याबरोबर बाजारात गेला. त्यालाही काहीतरी शंका आली असावी. त्यामुळे त्याने तिचा हात आपल्या हातात धरुनच ठेवला होता.

तथापि, ठरलेल्या योजनेप्रमाणे तिचा प्रियकर बाजारात ठरल्या ठिकाणी येऊन उभा राहिला. त्याला पाहताच तिने पतीचा हात सोडला आणि ती सरळ प्रियकराबरोबर पतीच्या डोळय़ादेखत पळून गेली. या प्रसंगाची या परिसरात चवीचवीने चर्चा होत आहे. मात्र, एवढय़ावरच हे प्रकरण थांबत नाही. पळून जाताने तिने तिच्या लग्नात मिळालेले आणि पतीनेही कौतुकाने तिला दिलेले सर्व दागिने, जे तिच्या अंगावर होते, त्यांच्यासह ती पळाली. हा पतीला दुहेरी फटका बसला. आता हे प्रकरण पोलिसात गेले आहे. तिचे या युवकाशी 6 वर्षांपासून संबंध होते असे समजून आले आहे. तिचे कोणावर प्रेम होते, तर तिने लग्न का केले असा रास्त प्रश्न तिच्या सासूला पडला आहे. पण आता करणार काय, असा प्रश्न आहे. विशेष म्हणजे बाजारातील या प्रसंगाचे तेथील सीसीटीव्ही कॅमेऱयात चित्रण झाले असून ते प्रसिद्ध झाले आहे. हा मोठय़ा चर्चेचा विषय झाला आहे.









