पतीनेही गळफासाने केली आत्महत्या
वार्ताहर/ विजापूर
चारित्र्याच्या संशयातून पतीने आपल्या पत्नीचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केला व आपणही गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना आलमेल तालुक्यातील कडणी रस्त्यावरील मेहबूबनगर येथे घडली आहे. पतीचे नाव हणमंत पुजारी (35) व यल्लवा पुजारी (30) असे पत्नीचे नाव आहे. या घटनेमुळे त्यांचा दोन वर्षीय मुलगा अनाथ झाला आहे. याप्रकरणी आलमेल पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
याबाबतची माहिती अशी की, हणमंत हा मूळचा आलमेल तालुक्यातील नागरहळ्ळीचा रहिवासी आहे. तो गेल्या तीन वर्षांपासून आलमेल येथे आपल्या पत्नी व मुलासह नोकरीनिमित्त रहात होता. हणमंतला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. या कारणामुळे त्यांच्यात दररोज भांडणे होत होती. आज सकाळी 6 च्या दरम्यान पती हणमंतने पत्नी झोपेत असताना तिच्यावर तिक्ष्ण हत्याराने वार करून तिची हत्या केली व स्वतः घरात तुळईला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचा दोन वर्षीय मुलगा झोपला होता. मुलगा झोपेतून उठल्यावर आई-बाबा निपचित पडल्याचे पाहून तो रडू लागला. यावेळी शेजाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा दोघेही पती-पत्नी मृतावस्थेत आढळून आले. त्यांनी आलमेल पोलीस ठाण्यात फोन करून याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला व मृतदेह विच्छेदनासाठी इस्पितळात पाठविले. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.









