मनपाच्या 30 पैकी 25 जागांवर विजय,विरोधी गटाचे 4 तर 1 अपक्ष विजयी : मोन्सेरात पुत्र रोहीत यांचा मंडळात प्रवेश महापौर मडकईकर यांना सर्वाधिक मताधिक्य
प्रतिनिधी /पणजी
पणजीचे भाजप आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या गटाने पणजी महानगर पालिका निवडणुकीत 30 पैकी 25 वॉर्डात विजय नोंदवून विरोधकांचे पानिपत केले आणि आपले पणजी मनपावरील वर्चस्व कायम राखले. माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांच्या गटाला फक्त 4 वॉर्डात विजय मिळाला. संतोष सुर्लीकर हे एकमेव अपक्ष उमेदवार वॉर्ड 23 मधून विजयी झाले आहेत. भाजपमधील बंडखोरांना निवडणुकीत हार पत्करावी लागली. आता पणजीचा महापौर कोण होणार, याकडे राजधानीतील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. निकालानंतर मोन्सेरात यांनी विजयी उमेदवारांसह राजधानी पणजीत फेरी मारुन फटाके फोडून विजयोत्सव साजरा केला.
पणजी मनपा निवडणुकीची मतमोजणी पणजीतील फार्मसी कॉलेजमध्ये झाली. या निवडणुकीत मतदान यंत्राचा वापर करण्यात आल्यामुळे सर्व 30 वॉर्डांचे निकाल झटपट लागले. सकाळी 8 वा. मतमोजणी सुरु झाली आणि 3 तासात म्हणजे सकाळी 11 पर्यंत सर्व निकाल जाहीर करण्यात आले.
मोन्सेरातांचे मनपावरील वर्चस्व पुन्हा सिद्ध
फुर्तादो गटाने मोन्सेरात गटाला आव्हान दिले होते. ज्यांना भाजपने उमेदवारी नाकारली ते काहीजण फुर्तादो गटात सामील झाले आणि बंडखोरी करुन रिंगणात उतरले. त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या निकालामुळे मोन्सेरात यांचे पणजी मनपावरील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आता मोन्सेरात ठरवतील तोच विजयी उमेदवार महापौर, उपमहापौरपदाचा मानकरी ठरणार आहे.
पाच वॉर्ड मोन्सेरातांच्या हातून निसटले
पणजी मनपाच्या 30 वॉर्डात आपलेच उमेदवार विजयी होणार असा दावा मोन्सेरात यांनी केला होता, परंतु 5 वॉर्ड त्यांच्या हातून निसटले. तथापि, त्यांच्या गटाने पणजी मनपावर झेंडा फडकावून निर्विवाद बहुमत मिळवले आहे. पणजी मनपातील 30 पैकी 25 वॉर्डात विजय मिळाला असल्याने मोन्सेरात गटाचा महापौर – उपमहापौर बिनविरोध निवडून येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. फुर्तादो पती – पत्नी या निवडणुकीत विजयी झाले. फुर्तादो गटाला ‘आप’ने पाठिंबा दिला होता परंतु मोन्सेरात गटासमोर त्यांचे काहीच चालले नाही. ही निवडणूक पक्षीय पातळीवर नव्हती परंतु भाजपने पाठिंबा देऊन त्यात उमेदवारांना गटासह उतरवले होते.
बाबुशपूत्र रोहित, यतीनपूत्र करणचा मनपा प्रवेश
आमदार मोन्सेरात यांचे पुत्र रोहीत व माजी नगरसेवक यतीन पारेख यांचे पुत्र करण या पणजी मनपा निवडणुकीत विजयी झाले असून ते आता नगरसेवक बनून त्यांनी पणजी मनपा मंडळात प्रवेश केला आहे. मावळते महापौर उदय मडकईकर यांनी सर्वाधिक म्हणजे 601 मते घेऊन विजय नोंदवला आहे. मोन्सेरात गटातच आता महापौर पदासाठी चुरस लागण्याची चिन्हे दिसत आहेत.
पणजी मनपातील 30 वॉर्डातील विजयी उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे :
- 1 काब्राल नेल्सन फ्रांन्सिस्को – 381
- 2. फर्नांडिस युवराज फ्रान्सिस – 572
- 3. मोन्सेरात रोहीत – 498
- 4. पो. करोलिना – 399
- 5. शिरगांवकर शुभदा रुपेश – 432
- 6. फुर्तादो सुरेंद्र – 359
- 7. लोरेना बेंतो सिल्वेस्टर – 409
- 8. आंद्रे जोएल सावियो – 496
- 9. रुथ फुर्तादो – 388
- 10. आमोणकर प्रसाद प्रकाश – 299
- 11. पारेख करण यतीन – 366
- 12. शेटये वर्षा हरी – 364
- 13. माईणकर प्रमेय प्रकाश – 367
- 14. मडकईकर उदय वामन – 601
- 15. चोपडेकर शायनी शरद – 536
- 16. केरकर अस्मिता संदेश – 475
- 17. जॉर्ज डेनिस एडवर्ड फ्रान्सिस – 375
- 18. अदिती चोपडेकर – 398
- 19. मोरजकर नरसिंह चंद्रकांत – 498
- 20. चोडणकर शुभम गोपाळ – 364
- 21. मणेरकर मनिषा – 388
- 22. माईणकर दिक्षा देवानंद – 354
- 23. सुर्लीकर संतोष धनंजय – 489
- 24. नाईक प्रांजल प्रजित – 457
- 25. नाईक संजीव शामसुंदर – 315
- 26. आगशीकर वसंत अशोक – 441
- 27. डायस लोरेन सुएलिन – 331
- 28. चोपडेकर विठ्ठल दयानंद – 412
- 29. फर्नांडिस सिल्वेस्टर – 258
- 30. डिकुन्हा सेंड्रा मारीया – 461
महापौर उदय मडकईकर सर्वात लोकप्रिय!
पणजी महापालिका निवडणुकीत बाबूश मोन्सेरात यांच्या पॅनलने एकूण 30 उमेदवार उभे केले होते. पैकी 25 जण विजयी झाले. विजयी झालेल्या एकूण 30 ही उमेदवारांच्या तुलनेत सर्वाधित आघाडी घेऊन विजयी झाले ते मावळते महापौर उदय मडकईकर.
मडकईकर हे प्रभाग क्र. 14 मधून 601 मते घेऊन विजयी झाले. या प्रभागात एकूण 991 मतदार आहेत. त्यातील 797 मतदारांनी मतदान केले. मडकईकर यांच्या विरोधात रत्नाकर फातर्पेकर यांना मिळालेले मतदान हे 25 टक्के तर उदय मडकईकर यांना मिळालेले मतदान हे 75 टक्के एवढे होते. यातील आश्चर्याची बाब म्हणजे बाबूश मोन्सेरात हे सर्व प्रभागात स्वतः प्रचारार्थ उतरले खरे परंतु मडकईकर यांच्या प्रभागात प्रचारासाठी गेलेच नाहीत. मडकईकर हे विजयी होतील याची त्यांना शाश्वती होतीच. खुद्द मोन्सेरात यांचे चिरंजीव रोहीत मोन्सेरात हे प्रभाग क्र. 3 मधून विजयी झाले त्यांना 498 मते मिळाली. त्यांच्या विरोधातील जोस मार्टिन्स यांनी 204 मते घेतली. मोन्सेरात यांना 70 टक्के मते मिळाली.
पुन्हा मडकईकर महापौर?
पणजी पालिकेत सर्वाधिक मते मिळवून विजयी झालेल्या उदय मडकईकर यांच्या गळ्य़ात महापौर पदाची माळ पडणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. किंवा मोन्सेरात यांचे चिरंजीव रोहीत मोन्सेरात हे महापौर होतील, असा अंदाज आहे.









