कोणतीही पूर्व कल्पना न देता पणजी मनपाची कृती : प्रति महिना भाडे भरणाऱया विक्रेत्यांवरही कारवाई
प्रतिनिधी / पणजी
पणजी महापालिकेतर्फे पणजी बसस्टँडवरील विविध विक्रेत्यांना कारवाईच्या नावाखाली हटवण्यात आले असून त्यांनी या प्रकरणाचा निषेध नोंदवला आहे. कोणतीही पूर्वसूचना कल्पना न देता कारवाई केली असा आरोप त्यांनी केला असून याप्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे.
कंदब महामंडळाने (केटीसी) सांगितले म्हणून सदर कारवाई केल्याचे व अतिक्रमणे हटवल्याचे पणजी मनपाचे म्हणणे आहे. या कारवाईमुळे विक्रेत्यांचे नुकसान झाले असून गोमंतकीयांना आता कोणीच वाली राहिला नसल्याची खंत त्यांनी प्रकट केली आहे.
कोरोना महामारीमुळे धंदा- व्यवसायात मंदी आली असून पावसाचा दिवसातील सदर कारवाई निर्षधार्ह असल्याचे विक्रेत्यांनी म्हटले आहे. विक्रेते यापूर्वीच आर्थिक संकटात असून कारवाईमुळे कंबरडे मोडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वेळोवेळी भाडे भरत असूनही या कारवाईबाबत त्यांनी आश्चर्य प्रकट केले असून त्यामागे मोठे षडयंत्र असल्याचा ठपका ठेवला आहे.
भाडे भरणाऱयांवरही कारवाई कशासाठी
पणजीच्या कंदब बसस्थानकाभोवती अनेक फळ- फुल विक्रेते तसेच दुकानदार गाडेवाले असून ते गेल्या अनेक वर्षापासून तेथे धंदा व्यवसाय करीत असल्याची माहिती देण्यात आली. कदंब महामंडळाला प्रति महिना भाडे देत असून दरवर्षी त्यात वाढ होत असते अशी माहिती विक्रेत्यांनी दिली असे असतानाही ही कारवाई कशासाठी? अशी विचारणा त्यांनी केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यांचे सामान फळे, फुले व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
अनेक विक्रेते व त्यांची मुले (पुढची पिढी) गेल्या सुमारे 40-50 वर्षापासून तेथे व्यवसाय करीत असून अनेक दुकाने कदंब महामंडळाच्या प्रक्रियेतून देण्यात आली आहेत अशी माहिती काही दुकानदारांनी दिली. आम्ही आता जायचे कुठे? धंदा कुठे करायचा? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. पणजी मनपा केटीसी यांच्या गैसरमज असून त्याचा फटका बसतो असे त्यांनी सांगितले. आमच्या अस्तित्वाचा प्रश्न असल्याचे ते म्हणाले.