नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो यांचा प्रश्न
प्रतिनिधी/ पणजी
स्मार्ट सिटीच्या नावाखाली राजधानीत चाललेली खोदकामे आणि त्यातून शहराची झालेली दैनावस्था केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिसू नये यासाठीच त्यांची सभा पणजीऐवजी फोंडा येथे आयोजित करण्यात आली, असा दावा पणजीचे नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो यांनी केला आहे.
खरे तर शहा यांची सभा पणजी किंवा मेरशीत ठेवायला हवी होती. परंतु भाजपच्या पणजी आमदाराने शहर उद्ध्वस्त केले आहे. एवढा मोठा प्रकल्प हाती घेतला जात असताना जुन्या लाईन्स नेटवर्कचा आवश्यक अभ्यास करण्यात आला नाही. परिणामी भूमीगत जलवाहिन्या, वीजवाहिन्या, टेलिफोन केबल्स, आदींची नासधूस करून मलनिस्सारणाचे काम अव्याहतपणे करण्यात येत आहे.
हे प्रकार एवढ्यावरच न थांबता आता खात्यांतर्गत समन्वय नसल्याचे दावे करत एकमेकांवर दोषारोप करण्याचा खेळ सुरू झाला आहे, असे फुर्तादो यांनी म्हटले आहे.
या सर्व अव्यवस्थेमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा पार बोजवारा उडाला आहे. त्यातील गंभीरता लक्षात घेता शहरातील वाहतूक कोंडीबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला स्वेच्छा याचिका दाखल करून घ्यावी लागली आहे, यावरून सत्यस्थितीचा अंदाज येऊ शकतो, असे फुर्तादो यांनी म्हटले आहे.
अशावेळी श्री. शहा यांनी मुद्दाम पणजीत यावे व शहराचा फेरफटका मारावा. त्यातून पणजी शहर कसे उद्ध्वस्त झाले आहे ते याची डोळा पहावे. तसेच शक्य असल्यास हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दिल्लीहून खास एखाद्या केंद्रीय अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. पणजीला आमदार किंवा महानगरपालिका यांच्या दयेवर सोडू नये, अशी विनंती फुर्तादो यांनी केली आहे.








