कामगार नसल्याने व्यावसायिक अडचणीत
प्रतिनिधी / पणजी
लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर काल सोमवारी दीर्घ काळानंतर राज्यातील हॉटेल व रेस्टॉरंट काही प्रमाणात सुरू झाली. तरीही 25 टक्केही हॉटेल व रेस्टॉरंट सुरू होऊ शकली नाहीत. कारण सध्या आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध नाही. त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॉटेलमध्ये जाण्याची मानसिकता लोकांमध्ये तयार होण्यास आणखी काही काळ लागेल.
हॉटेल आणि रेस्टॉरंट संघटनेचे अध्यक्ष गौरीश धोंड यांनी सांगितले की कामगार उपलब्ध नसल्याने 25 टक्क्यापेक्षा जास्त हॉटेल, रेस्टॉरंट सुरू होण्याची शक्यता नाही.
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधून काम करणारे कर्मचारी हे अधिकतर बिगर गोमंतकीय आहेत. ते गावी गेल्याने मनुष्यबळ उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे. काल पणजीत काही हॉटेल्स खुली करण्यात आली. मात्र हॉटेल खुली झाली तरी सध्या ग्राहक हॉटेलमध्ये फिरकत नाहीत. कुकपासून वेटरपर्यंत बहुतेक कर्मचारी हे गोव्याबाहेरचे आहेत. लॉकडाऊन झाल्यानंतर हॉटेल व्यावसाय बंद झाला. कामगारांना कामच राहिले नसल्याने त्यांनी गावी जाणे पसंत केले.
थर्मल गनने तपासणी करून प्रवेश
सुरू केलेल्या काही हॉटेलमध्ये ग्राहकांना थर्मल गनने तपासणी करून प्रवेश देण्यात आला तर काही हॉटेलनी रोजच्याप्रमाणे पार्सल देण्यावरच भर दिला. हॉटेल व्यवसाय पूर्वपदावर येण्यास अजून काही काळ लागणार आहे. कारण राज्यात कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे लोकांमध्ये कोरोनाबाबत मोठी धास्ती आहे. हॉटेल व्यावसायिकही पूर्ण तयारीत नाहीत. त्याचबरोबर पर्यटकही नाहीत. त्यामुळे तूर्त हॉटेल व्यवसाय पूर्ण जोरात सुरू होण्याची शक्यता कमीच आहे.









