मौसमातसुद्धा झाला नाही एवढा मोठा विक्रम : पुढील 15 दिवस पावसाची शक्यता
प्रतिनिधी / पणजी
बुधवारी सायंकाळी राज्यभरात सुरु झालेल्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. पहाटेपर्यंत सर्वच परिसराला झोडपून काढले. पहाटेपर्यंत अनेक नद्या पुन्हा दुथडी भरुन वाहू लागल्या. राज्यात सर्वच ठिकाणी पडलेल्या मुसळधार पावसाची सरासरी 6 इंच एवढी विक्रमी नोंद झाली आहे. पणजीत ऐन मौसमात देखील एवढी विक्रमी नोंद झाली नाही ती 6 तासांत 7.50 इंच एवढी नोंद झाली.
बंगालच्या खाडीत आणखी एक चक्रिवादळ निर्माण होण्याची परिस्थिती असल्याने गोव्यात पुढील 15 दिवस पाऊस चालूच राहण्याची शक्यता आहे.
बुधवारी सायंकाळी पावसाने कहर केला. राज्यातील सर्वच भागाला अक्षरशः झोडपून काढले. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात सरासरी 5 इंचापेक्षाही जास्त पाऊस झालेला आहे. मान्सूनोत्तर पावसाने गंभीर स्वरुप धारण केलेले आहे. वीजांच्या चकचकाटासह जोरदार आणि गडगडय़ासह सायं. 6.30 वा.पासून सुरु झालेला हा पाऊस पणजीत प्रत्यक्षात 7.30 वाजण्याच्या दरम्यान जोर वाढला. पहाटे दीड वाजेपर्यंत पणजीत धुँवाधार पाऊस पडला.
गोव्यातील सर्वाधिक नोंद पणजीत
बुधवारी सायंकाळी उशिरा सुरु झालेल्या मुसळधार पावसाने राज्यातील बहुतांश नद्या तुडूंब भरुन वाहू लागल्या. पुन्हा पूर येईल की काय? अशी स्थिती मध्यरात्री उशिरा निर्माण झाली मात्र मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर थोडा मंदावला. पहाटे 1 वा.पर्यंत पणजीत जोरदार पाऊस चालू होता. सांखळीमध्ये पहाटे 3 पर्यंत पावसाचा जोर कायम होता. म्हापशामध्ये देखील पहाटे 3 पर्यंत जोरदार पाऊस पडत होता. या पावसाने अनेक विक्रम मोडले. केवळ 5 ते 6 तासांत तौक्ते वादळानंतर प्रथमच एवढा मुसळधार व सुमारे 6 इंचपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे. ऐन मौसमात देखील एवढा पाऊस पडला नाही एवढा पाऊस बुधवारी अवघ्या 5 ते 6 तासांत पडलेला आहे.
11 ऑक्टोबर पर्यंत पावसाचा जोर
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी गोव्यात कमी दाबाचे क्षेत्र कार्यरत होते. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या पावसाच्या दबावाचा गोवा व आसपासच्या परिसरावर परिणाम झाल्याने गोव्यात मुसळधार पाऊस झाला. आजही राज्यात सर्वत्र गडगडाटासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. याशिवाय बंगालच्या खाडीत कमी दाबाचा प्रभाव वाढत असून हवामान खात्याचे सारे लक्ष बदलत्या वातावरणाच्या हालचालीवर आहे. या कमी दाबाच्या पावसाचे चक्रिवादळात रुपांतर होण्याची शक्यता वाढली आहे. पुढील दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल. तथापि, त्याचा परिणाम अरबी समुद्रावर होणार असून गोव्यात पुढील काही दिवसांत जोरदार पावसाची त्याचबरोबर जोरदार वारे वाहण्याची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे. आतापर्यंत यंदाच्या वर्षभरात बंगालच्या खाडीत 5 चक्रिवादळे येऊन गेली. आता हे नव्याने चक्रिवादळ तयार होत असून ते सहावे आहे. त्याचा फटका आंध्रप्रदेशला बसणार आहे.
बुधवारी सायंकाळी पडलेला विक्रमी पाऊस
पणजी 7.50 इंच
म्हापसा 5.50 इंच
जुने गोवे 5.00 इंच
सांखळी 3.75 इंच
वाळपई 3.50 इंच
काणकोण 2.50 इंच
मडगाव 3.50 इंच
पेडणे 3.50 इंच
केपे 5.00 इंच
सांगे 4.00 इंच









