गेल्या दोन वर्षांत 50 लाखांची लूट झाल्याचा दावा ; नगरसेवक उदय मडकईकर यांनी केला भांडाफोड
पणजी : पणजी मार्केट परिसरात व्यापाऱ्यांकडून सोपो गोळा करण्याच्या नावाखाली मोठी लूट चालल्याचे उघडकीस आले असून हा घोटाळा दुसऱ्या तिसऱ्या कुणी नव्हे तर खुद्द माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक उदय मडकईकर यांनीच उघडकीस आणला आहे. त्यामुळे मनपा आता सोपो गोळा करणाऱ्यांवर कोणती कारवाई करते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.हा घोटाळा थोडाथोडका नव्हे तर तब्बल 50 लाख ऊपयांचा असल्याचा दावा मडकईकर यांनी केला आहे. मनपा मार्केटातील विक्रेत्यांकडून प्राप्त माहितीनुसार मडकईकर यांनी काल रविवारी स्वत: मार्केटात जाऊन पाहणी केली असता त्यात तथ्य असल्याचे दिसून आले. तेथे सोपो गोळा करणारा कर्मचारी व्यापाऱ्यांकडून पैस वसूल कऊनही त्यांना पावती देत नसल्याचे मडकईकर यांनी पाहिले. त्यानुसार त्यांनी सदर कर्मचाऱ्यास जाब विचारण्याचेही प्रयत्न केले. परंतु त्यावेळी तो त्यांना आपणाकडे पावती पुस्तकच नाही, असे सांगून उर्मट आणि उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे.
महिन्याकाठी 2.10 लाख वसुली
गेल्या सुमारे दोन वर्षांपासून सदर प्रकार सुरू असल्याचे वृत्त आहे. रोज किमान 7 हजार ऊपये गोळा करण्यात येत असून त्यानुसार हिशेब केल्यास महिन्याचे 2.10 लाख तर दोन वर्षांचे सुमारे 50 लाख होतात. मात्र सोपोची पावती मागितल्यास आपणास बाजारातून हटविले जाण्याच्या भीतीतून विक्रेते मुकाट्याने पैसे देतात.
पैसे घेतो, पण पावती नाही देत
पणजी मार्केटच्या बाहेर खुल्या जागेत रोज सकाळी 6 ते 9 या वेळेत हे विक्रेते भाजी, फळे, नारळ, आदी साहित्याची विक्री करतात. मार्केटच्या दुसऱ्या बाजूने मासळी विक्रेते बसतात. या सर्वांकडून रोज 20 ऊपये सोपो गोळा करण्यात येतो. परंतु त्याबदल्यात पावती मात्र देण्यात येत नाही. त्यावरून सदर प्रकार म्हणजे मोठा घोटाळा असल्याचे सिद्ध होत आहे, असे मडकईकर यांनी म्हटले आहे.
मनपाने पोलीस तक्रार करावी : मडकईकर

अशाप्रकारे वसुल करण्यात आलेल्या पैशांचा कोणताही हिशोब नसल्यामुळे हे पैसे कुणाच्यातरी खिशात गेले असल्याचे स्पष्ट होत आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून याप्रकरणी मनपाने पोलीस तक्रार करून सखोल चौकशी करावी. हा प्रकार आपण मनपा आयुक्तांसह महापौर रोहित मोन्सेरात यांच्या नजरेस आणून दिला असून या घोटाळ्याची पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनीही दखल घ्यावी, असेही मडकईकर यांनी म्हटले आहे.









