पंचायत समितीच्या मासिक सभेत मागणी, कृषी व शिक्षण विभाग धारेवर
शहर वार्ताहर / राजापूर
तालुक्यातील पडवे येथील जवाहर नवोदय विद्यालयाचा कारभार भ्रष्ट असून याची सखोल चौकशी करण्यात यावी. य्ािंमुळे जिल्हय़ातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला न्याय मिळत नाही. या नोकरशाहीला गटविकास अधिकारी पाठीशी घालत असल्याचा खळबळजनक आरोप बुधवारी पंचायत समितीच्या मासिक सभेत करण्यात आला.
राजापूर पंचायत समितीची मासिक सभा सभापती प्रमिला कानडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसभापती उन्नती वाघरे, गटविकास अधिकारी सागर पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी सुशांत एकल यांच्यासहीत पंचायत समिती सदस्य, सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या सभेमध्ये शिक्षण विभागाला अभिजित तेली, प्रकाश गुरव, विशाखा लाड यांनी धारेवर धरले. गटशिक्षणाधिकारी अकार्यक्षम असून त्यांना गटविकास अधिकारी पाठीशी घालत आहेत. जवाहर नवोदय विद्यालयामध्ये परजिह्यातील विद्यार्थी खोटे दाखले देत प्रवेश घेत आहेत आणि हे अनेक वर्षे चालू असून त्याला येथील शिक्षण व्यवस्थाच जबाबदार आहे. यामुळे स्थानिक विद्यार्थ्याना जवाहर नवोदयमध्ये प्रवेश मिळत नसून येथील विद्यार्थ्यामध्ये गुणवता असूनही ती दडपली जात असल्याचा आरोप अभिजित तेली व प्रकाश गुरव यांनी केला. विशाखा लाड यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही शिक्षक अद्यापही आपल्या गावीच असून शाळेमध्ये हजर झालेले नाहीत, अशा शिक्षकांची चौकशी करून केंद्रप्रमुख व संबधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. यापुढे नवोदयमध्ये प्रवेश घेणाऱया विद्यार्थ्याची कसून तपासणी करून त्यांना प्रवेश द्यावा, तालुक्याला कोटा वाढवून मिळावा, अशी मागणी प्रकाश गुरव यांनी केली
तालुक्यामध्ये 14 नवीन वैद्यकीय अधिकाऱयांची नेमणूक करण्यात आली असून लवकरच तालुका टास्कफोर्सची स्थापना करण्यात येईल, अशी माहिती आरोग्य अधिकारी विजय साबळे यांनी दिले. यावेळी टास्क फोर्समध्ये तज्ञ मंडळीची नियुक्ती करावी व ज्या ठिकाणी अडचणी वाटत असतील तिथे प्रथम वैद्यकीय अधिकाऱयांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली. राजापूर आगारातील 32 कर्मचारी मुंबईला सेवा बजावत असल्याने येथील एस.टीची सेवा कोलमडली आहे. हे 32 कर्मचारी राजापुरात दाखल होताच बससेवा पूर्ववत सुरळीत होईल. राजापूर आगार तोटय़ामध्ये असून भारमान मिळवण्यासाठी लोकप्रतिनिधीनी खास प्रयत्न करावेत, असे आवाहन आगारप्रमुख राजेश पाथरे यांनी केले.
राजापूर कृषी कार्यालयातील जे कृषी अधिकारी सजावर राहत नाहीत त्यांचे घरभाडे थांबवण्यात यावे, अशी मागणी करीत कृषी अधिकारी शेतकऱयांसाठी आहेत का शेतकरी कृषी अधिकाऱयांसाठी, असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. पाणी पुरवठा विभागातील ज्या ठेकेदारांनी जाणूनबुजून योजना रखडवली आहे, अशा ठेकेदारांना काळया यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी चर्चेत बाजीराव विश्वासराव, प्रतिक मठकर, प्रशांत गावकर, अभिजित तेली, प्रकाश गुरव यांनी सहभाग घेतला. या बैठकीत सर्व विभागाचा आढावा घेण्यात आला.









