बेंदराच्या आदल्या दिवशीच वडूजला लॉकडाउनची कळ
प्रतिनिधी/ वडूज
आत्तापर्यंत खटाव तालुक्याच्या कानाकोपर्यातील अनेक गावात कोरोना संसर्गजन्य आजाराने शिरकाव केला होता. मात्र गेली तीन महिने तालुक्याची राजधानी असणारे वडूज गांव अभेद हेते. मात्र ठाण्याहून गावी येत असणार्या 55 वर्षीय वाहक वडूज येथे कोरोना पॉझीटीव्ह सापडला आहे. तो मुळचा खटाव तालुक्यातील पडळचा रहिवाशी आहे. त्यामुळे ‘पडळ’ कर वाहकाची वडूजला नाहक झळ बसली आहे. हा रुग्ण सापडल्यामुळे प्रशासनाने वडूजचा बहुतांशी भाग कन्टेनमेंट झोन म्हणून जाहीर केल्याने अनेक रस्ते अडविण्यात आले आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी, पडळ येथील एकजण ठाणे येथे एस.टी. वाहक म्हणून कार्यरत आहे. त्यांची पत्नी व मुलगी वडूज येथील दहिवडी रस्त्यावरील एका इमारतीत वास्तव्यास आहेत. बुधवारी सदर व्यक्ती ठाण्याहून सातारा येथे व सातारा येथून वडूजला एस. टी. बसमधून आली. त्यांना वाटेतच श्वसनाचा त्रास होवू लागल्याने मोबाईल फोनवरुन त्यांनी घरच्यांना कल्पना दिली. घरच्या मंडळींनी मित्र परिवारातील एका युवकास मारुती व्हॅन घेवून बस स्थानक परिसरात तयार ठेवले होते. एस. टी. बस वडूज येथे आल्यानंतर रुग्णाजवळची बॅग व इतर साहित्य घरी पाठविण्यात आले. तर रुग्ण, त्याची पत्नी मारुती व्हॅनमधून मायणी येथील मेडीकल कॉलेजमध्ये गेले. त्या ठिकाणी तपासणी केल्यानंतर सदरच्या रुग्णास सातारा येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहे. त्या ठिकाणी संबंधित व्यक्तीवर उपचार सुरु झाले आहेत. तर पत्नीस संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे. जो व्हॅनचालक मायणीला घेवून गेला होता त्यासही हाय रिस्क म्हणून मायणी येथील मेडीकल कॉलेजमध्ये क्वॉरंटाईन केल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली.
हा प्रकार समजताच पोलीस निरीक्षक अशोक पाटील यांनी वडूज-पुसेगांव रस्त्यावर हॉटेल यशोदिप नजीक, वडूज-दहिवडी रस्त्यावर हुतात्मा हायस्कुल नजीक, वडूज-कराड रस्त्यावर कुरोली फाटा, शहा पेट्रोलपंप आदी ठिकाणी बॅरिगेट लावण्याबरोबर धान्य बाजार गल्ली, व्यापारी पेठ, पेडगांव रोड व इतर छोटे-मोठे रस्ते बंद केले आहेत. मुख्य रस्ते बंद केल्याने सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास शहा पेट्रोलपंपानजीक चांगलीच गर्दी झाली होती. या गर्दीमुळे एस. टी. बस तसेच अन्य मोठय़ा वाहनांची बराच वेळ कुचंबना झाली होती.









