प्रतिनिधी/मुंबई
‘दबंग’ सारख्या अनेक चित्रपटात खलनायक साकारणा-या एका अभिनेत्याने आपण ख-या आयुष्यात मात्र नायकच आहोत हे त्याच्या कृतीतून दाखवून दिले आहे. बॉलिवूड, टॉलिवूड गाजवणारा अभिनेता सोनू सुदने या लॉकडाऊनच्या काळात मुंबईत अडकलेल्या अनेक कामगारांना आपल्या घरी पोहचण्यासाठी बस गाड्यांची सोय केली. त्याच्या याच कामाचं राज्याचे कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी कौतुक केलं आहे. ‘पडद्यावर खलनायकाचं काम करणारा, प्रत्यक्ष आयुष्यात हिरोचं काम करत असल्याचं’ जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वी सोनूने मुंबईत अडकलेल्या कर्नाटकातील कामगारांना घरी जाण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांची परवानगी घेत १० बस गाड्यांची सोय केली. याआधीही सोनू सुदने करोनाविरुद्ध लढ्यात आपला सक्रीय सहभाग नोंदवला आहे. अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपल्या हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यापासून ते डॉक्टरांना PPE किट देण्यापर्यंत सोनूने आपली सामाजिक जबाबदारी पूर्ण केली आहे.
सोनूने यापूर्वी बिहारच्या अनेक मजुरांना त्यांच्या घरी पाठवलं. ट्विटरद्वारे त्यांच्याशी संपर्क साधणाऱ्या सर्वांची सोनू मदत करत आहेत. वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी मुंबईतील जुहूमधील हॉटेलचे दरवाजेही उघडले. याआधी जेव्हा देशात लॉकडाऊन सुरु झालं, तेव्हा त्याने वडील शक्ती सागर सूद यांच्या नावे एक योजना सुरू केली, ज्या अंतर्गत तो दररोज ४५ हजार लोकांना जेवण देत होता.
वैयक्तिक आयुष्यात अत्यंत संवेदनशील असलेल्या सोनूने या स्थलांतरितांच्या मदतीच्या हाकेला त्वरीत उत्तर दिले आणि त्यांची घरी परत जाण्याची सोय केली.