हुपरी/वार्ताहर
महाराष्ट्रासह अनेक राज्यात प्रसिद्ध असलेले जागृत देवस्थान श्री विठ्ठल बिरदेव देवाची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करावी. शासनाने मंदिरे उघडली ती दर्शन घेण्यासाठी शिस्तबद्ध पद्धतीने शासनाच्या नियमांचे पालन करून, तज्ज्ञांचे वैद्यकीय पथक नेमून यात्रा कार्यक्रम व भाकणूक २५ भाविकांच्या उपस्थितीत पार पाडावी अशी सूचना इचलकरंजी विभागाचे प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी दिली.
पट्टणकोडोली( ता. हातकणंगले ) येथील जागृत देवस्थान श्री विठ्ठल बिरदेव मंदिराच्या सभागृहात यात्रेचे नियोजन व उपाययोजना करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
खरात पुढे म्हणाले की, गेली दोन वर्षे जगात कोरोना महामारीने हाहाकार माजवला आहे. या पार्श्वभूमीवर देवाची यात्रा रद्द करावी, दुकाने, स्टॉल, खेळणी दुकाने व इतर कोणतीच दुकाने मांडू नयेत, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची रांगेतून सोय करणे, फरांडे बाबांच्या हेडम कार्यक्रमास कोणताच अडथळा येणार नाही अशा प्रकारे भाकणूक गाभाऱ्यात मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत पूर्ण करणे असे सांगितले.
यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी म्हणाले, शासनाच्या नियामाचे पालन करीत धार्मिक व रूढी परंपरेनुसार सर्व विधी पूर्ण केला जाईल. कोणत्याही भाविकांच्या मनात गैरसमज होऊन वादावादी, भांडणे होणार नाहीत ,रीतसर दर्शन घेणाऱ्या भाविकांना कोणताच त्रास होणार नाही याची जबाबदारी घेणे गरजेचे आहे. गेल्या वर्षी प्रमाणे मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत यात्रा संपन्न होइल. कर्नाटक मधील भाविकांना यात्रा रद्द झाल्याबद्दल कर्नाटक सरहद्दीवर कन्नड, मराठी भाषेत बोर्ड लावणे गरजेचे आहे. कोणताही महाप्रसाद घेतला जाणार नाही असे सांगितले.