ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्यमंत्रिपदाचा राजीनामा मी दिला नाही. पक्षातील हितचिंतक आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून माझ्या राजीनाम्याच्या अफवा पसरविण्याचे काम सुरू आहे, असा आरोप महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे.
सत्तार यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. मुख्यमंत्री आणि सत्तार यांच्यामध्ये 20 मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रीया दिली.
सत्तार म्हणाले, मी राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही. मी दिलेल्या जबाबदारीवर समाधानी आहे. दिलेली जबाबदारी मी पार पाडण्यात कुठेही कमी पडणार नाही. माझ्या राजीनाम्याबाबत कोणी पुडय़ा सोडल्या, याची माहिती शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी दिली आहे. त्याची चौकशी व्हावी. तसेच औरंगाबादेतील शिवसेनेच्या नेत्यांना बोलावून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार आहे.