प्रतिनिधी/ सातारा
लोकअदालतीमध्ये पक्षकारांनी सामंजस्याने व सुसंवादाने तडजोड करुन जास्तीत जास्त प्रकरणे मिटवावीत, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांनी केले. सातरा येथील जिल्हा न्यायालयात शनिवारी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीच्या उद्घाटन प्रमुख या नात्याने यावेळी त्या बोलत होत्या. या उद्घाटन प्रसंगी जिल्हा न्यायाधीश एन. एल. मोरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती जाधव, जिल्हा सरकारी वकील ऍड महेश कुलकर्णी यांच्यासह न्यायालयातील न्यायाधीश, वकील, पक्षकार उपस्थित होते.
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे निकाली निघावीत यासाठी पक्षकारांचे मनपरिर्वतन करावे. वाद हा सुसंवादातूनच मिटला जातो. गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या संसर्गामुळे अनेक जाणांच्या निकटवर्तींयाचे निधन झाले. माणसाने माणसे जोडली पाहिजेत, यासाठी सुसंवाद ठेवला पाहिजे. आजच्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये पक्षकारांनी सुसंवादातून जास्तीत जास्त प्रकरणे मिटवावीत, असे आवाहनही प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांनी केले.
नुकत्याच पार पडलेल्या या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये सर्व प्रकारचे दिवाणी दावे व तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आली आहेत. जिल्हा न्यायालयात दाखल असलेली विविध प्रकरणे सामंजस्याने मिटावीत म्हणून 11 पॅनेल व ग्रामपंचायतीकडील घर व पाणीपट्टी प्रकरणांसाठी सातारा पंचायत समितीध्ये 1 पॅनल असे एकूण 12 पॅनल तयार करण्यात आले. प्रत्येक पॅनलमध्ये 1 न्यायाधीश, 2 वकील व 4 कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली. या राष्ट्रीय लोकअदालतीमुळे पक्षकारांचा वेळ व पैसा वाचणार आहे. तरी जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी पॅनेवरील न्यायाधीश व वकील यांनी प्रयत्न करावेत, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती जाधव यांनी प्रास्ताविकात सांगितले.








