मुंबईत घेतला अखेरचा श्वास
सांस्कृतिक प्रतिनिधी/ फोंडा
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्राrय गायक आणि जयपूर अत्रोली घराण्याचे थोर साधक पं. दिनकर पणशीकर (84) यांचे सोमवार दि. 2 रोजी अंबरनाथ मुंबई येथील संजीवन हॉस्पिटलमध्ये ह्रदयविकाराच्या झटक्याने देहावसान झाले. ज्येष्ठ अभिनेते स्व. प्रभाकर पणशीकर व प्रसिद्ध प्रवचनकार स्व. दाजी पणशीकर यांचे ते कनिष्ठ बंधू होत. गायक पं. भूपाल पणशीकर व तबला नवाझ शांतनू पणशीकर यांचे ते वडील होत.
पं. सुरेशराव हळदणकर, पं. वसंतराव कुलकर्णी तसेच पं. निवृत्तीबुवा सरनाईक यांच्याकडून त्यांनी संगीताची दिक्षा घेतली. पं. दिनकर पणशीकर यांचा जन्म 1936 साली मुंबई झाला. त्यांनी गुजरातमधील पाटण येथे गुरु दत्तात्रय कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत ज्ञानार्जनाला सुरुवात केली. पुढे मुंबईत वसंतराव कुलकर्णी आणि सुरेश हळदणकर यांच्याकडून संगीताच्या प्रगत शिक्षणाला आरंभ केला. पुढे त्या काळचे महान गायक निवृत्तीबुवा सरनाईक यांच्याकडे पणशीकर बुवांनी गुरुशिष्य परंपरेद्वारे संगीत शिक्षण घेतले.
मूळ गोमंतकीय पणशी-पेडणे येथील
निवृत्तीबुवांच्या गायकीची चिरस्थायी छाप आपल्या कंठावर असल्याची कृतज्ञ भावना त्यांच्याकडून व्यक्त क्हायची. पणशीकर हे प्रतिभावंतांचे घराणे मूळ पेडणे येथील पणशे गावचे असून प्रख्यात गायक पं. रघुनंदन पणशीकर हे त्यांचे पुतणे होत. डगोरी, शिवमत भैरव, यमनी बिलावल, बिहागडा, झिंझोटी, मारु बिहाग, शुद्ध सारंग अशा अनेक रागदारी रचनावर अर्थपूर्ण संस्कार त्यांनी घडविले. त्याचप्रमाणे काही रचनामध्ये सकारत्मक बदल घडवून त्यांनी आपल्या चिंतनशिल वृत्ताची साक्ष दिल्याचे जाणकार सांगतात.
कला अकादमीत दिली सेवा
गोवा कला अकादमीमध्ये 2009 ते 2011 पर्यंत संचालक तथा व्याख्याता म्हणून त्यांनी आपल्या कुशलतेचा ठसा उमटविला. गोव्यातील कलाकारांना उत्तमरित्या मार्गदर्शन करण्याबरोबरच गोव्यातील कलावंत राष्ट्रीय शास्त्राrय संगीत प्रवाहाशी जोडले जावेत या दृष्टीने त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यानंतर पर्वरी येथे ते गोमंतकीय विद्यार्थ्याच्या हितार्थ वास्तव करून संगीत मार्गदर्शक म्हणून वावरले. संगीत विषयावरील त्यांचे साहित्य ज्यामध्ये विविध रागांवरील नवनवीन रचना अनवट रागांच्या बंदिशी तसेच विविध ताल, खास करून अडा चौतालमध्ये वैशिष्टय़पूर्ण सांगीतिक साहित्य त्यांनी निर्माण केले.
शेकडो शिष्य, हजारो चाहते
आपल्या गोव्यातील मुक्कामामध्ये त्यांनी शेकडो शिष्य तसेच हजारो चाहते मिळविले. त्यांचा संगीत क्षेत्रातील दांडगा अनुभव आणि साधना यामुळे अनेक संस्थांचे मान, सन्मान त्यांना प्राप्त झाले. संगीत विषयावर त्यांचे प्रभूत्व होते. संगीताच्या इतिहासावर अधिकारवाणीने भाष्य करणारे उत्तम असे ते वक्ते होते.
मुंबईत झाले अंत्यसंस्कार
त्यांच्या निधनामुळे भारतीय तसेच गोमंतकीय संगीत क्षेत्रात फार मोठी पोकळी निर्माण झाल्याच्या प्रतिक्रिया गोव्यातील गुणवंतांकडून व्यक्त झाल्या. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे त्यांचे पुत्र भुपाल पणशीकर यांच्याकडून समजले.
मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पणशीकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त आहे. त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की आपण एका महान गायकास मुकलो आहे. त्यांच्या जाण्यामुळे गोव्याचे फार मोठे नुकसान झाले आहे.
कुशल संगीत मार्गदर्शक
गोव्यातील शास्त्रीय संगीतासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याबरोबरच गोमंतकीय कलावंताना बरीच वर्षे त्यांनी शास्त्रीय संगीताची सुबद्ध तालीम दिली. गोव्यात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रीय गायक तयार व्हावेत ही इच्छा त्यांनी अनेकवेळा बोलून दाखविली. उत्तम वक्ते, महान गायक आणि कुशल संगीत मार्गदर्शक म्हणून गोमंतकाला त्यांनी आपला परिचय देतानाच गोव्यातील शास्त्रसंगीत शिकणाऱया विद्यार्थ्यांचे मनोबल आणि आत्मविश्वास वाढविण्याच्या दृष्टीने ते अक्षरशः धडपडले.
विद्यार्थ्यांच्या गळय़ातील ताईत
नेहमीच प्रसन्नमुद्रा आणि आत्मियतेने विद्यार्थ्यांशी वागण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे ते सर्वांमध्ये प्रिय होते. गोमंतकीय शिष्यवर्ग आणि चाहते यांच्या गळ्य़ातील ताईत बनलेल्या पं. दिनकर पणशीकरांच्या निधनामुळे त्यांच्या हितचिंतकांनी शोक व्यक्त केला. 2009 ते 2011 पर्यंत कला अकादमी गोवाचे संगीत विभागाचे संचालक आणि व्याख्याते म्हणून त्यांनी समर्थपणे कार्यभार सांभाळला. संगीत क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
संगीत क्षेत्राला तोटा : अलकाताई मारुलकर
जयपूर घराण्याचे थोर गायक पं. दिनकर पणशीकर मितभाषी होते. गायन विषयात ते निपुण होतेच शिवाय अत्यंत डोळसपणे आणि गांभिर्याने त्यानी संगीत साधना केली होती, असे उद्गार गानपंडिता अलकाताई मारुलकर यांनी पंडितजींच्या निधनाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना काढले. त्यांच्या चौफेर सांगीतिक ज्ञानाबद्दल आणि विद्वतेबद्दल जणकारांमध्ये आदरभावना होती. अनवट रागांबद्दलची माहिती आणि संगीत विषयाचे व्याकरण त्यांनी खऱया अर्थाने हस्तगत केले होते. अतिशय दिलखुलास आणि प्रसन्न असे ते व्यक्तिमत्त्व होते. आपण कला अकादमीच्या सेवेत असताना त्यांना भेटायचे. त्यांचे गाणे मी कमीच एकलेले आहे. कला अकादमीतील आपण केलेल्या कार्याबद्दल ते गौरवोद्गार काढायचे मात्र आपल्याला व त्यांनाही कलाकार घडविण्यासाठी पाहिजे तसा वाव मिळाला नाही, ही सलही त्यांनी व्यक्त केली. शेकडोंच्या संख्येने बांधलेल्या बंदिशी त्यांच्या प्रचंड विद्वतेची साक्ष असल्याचे सांगतानाच पंडितजींच्या मृत्यूमुळे संगीत क्षेत्राला तोटाच झाल्याचे गानविदुषी अलकाताई मारुलकर म्हणाल्या.
समर्थ आणि सक्षम कलाकार : प्रा. शषांक मक्तेदार
गोवा संगीत महाविद्यालयाचे प्राचार्य आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायक शषांक मक्तेदार म्हणाले की, खूप वर्षांपासून आपण त्यांना ओळखतो मात्र गोव्यात आल्यावर पं. पणशीकरांकडे खऱया अर्थाने आपले संबंध दृढ झाले. विद्वान, व्यासंगी आणि चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना आपल्या हृदयात स्थान होते. संगीताबरोबरच साहित्य क्षेत्राचाही ध्यास पंडितजींना होता. ते भरपूर वाचायचे. इंग्रजी साहित्याचेही ते भोक्ते होते. संगीतावर तात्विक चर्चा करण्याबरोबरच शास्त्रीय सांगीताला पूर्णत्व प्राप्त व्हावे यासाठी त्यांची कळकळ जाणवायची. खास करुन आडाचौतालमधील बंदिशी प्रचलीत करण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न प्रशंसनीय होते, असे शशांक मक्तेदार म्हणाले.
गोव्यामध्ये मुक्काम करुन गोमंतकीय विद्यार्थ्यांना त्यांनी गाणे शिकविले हे समस्त गोवेकरांचे भाग्य आहे. एक समर्थ आणि सक्षम कलाकार काळाच्या पडद्याआड झाल्याचे दुःख अनावर असून एक समर्पित कलाकार जे अगदी अलिकडे आपल्या संपर्कात होते ते कालवश झाल्याची बातमी दुःखद असल्याचे ते शेवटी म्हणाले.
गोमंतकीय होतकरु विद्यार्थ्यांसाठी वरदान : प्रेमानंद आमोणकर
कला अकादमीचे तबला विषयाचे व्याख्याता प्रेमानंद आमोणकर म्हणाले की पर्वरीत असताना पं. पणशीकरबुवा नियमित आपल्या घरी रियाजासाठी यायचे. संगीतातील पछाडलेले असे ते गुणी शास्त्रीय गायक होते. निवृत्तीबुवा सरनाईकांकडे त्यांनी गंडाबंधन करुन गुरुशिष्य परंपरेच्या माध्यमातून शास्त्राrय गायन संपादन केले. त्यांच्या सौभाग्यवतीनी त्यांना गायक होण्यासाठी प्रोत्साहित केले असे ते अनेकवेळा सांगायचे. चिंतनशिल, महेनती आणि कलासमर्पित अशा या कलावंताने अनेक शिष्य गोव्यामध्ये घडविले. त्याचप्रमाणे गोंमतकीय कलाकारांना गोव्याबाहेरही व्यासपीठ उपलब्ध करुन दिले. अत्यंत विनयशिल, सोज्वळ, व्रतस्थ, उदार तेवढेच स्पष्टवक्ते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचे गोव्यातील वास्तव्य हे गोमंतकीय होतकरु विद्यार्थ्यांसाठी वरदानच ठरले, असे प्रेमानंद आमोणकर म्हणाले.
स्वभाव, सामंजस्यामुळे कलाप्रेमीमध्ये प्रिय : राया कोरगावकर
गोवा संगीत महाविद्यालयाचे व्याख्याता तसेच ख्यातकिर्त संवादिनीवादक राया कोरगांवकर म्हणाले की साधारण तीन वर्षांपूर्वी बुवांची आणि आपली ओळख वाळपईतील त्यांच्या एका नातेवाईकांच्या घरी झाली. त्यानंतर त्याला साथ संगीत करण्याचे योग अनेकदा प्राप्त झाले. एक महान गायक आणि मार्गदर्शक म्हणून त्यांचे सांगितीक कार्य अतुलनीय, उल्लेखनीय तेवढेच उद्बोधक आहे. राग रागिणींचे भांडार म्हणूनच त्यांच्याकडे बघण्याची जाणकारांची दृष्टी होती. सांगितिक विषयावर अधिकारवाणीने ते बोलायचे. साधारण दीडशे ते दोनशे आडाचौतालमधील बंदिशीवर त्यांनी स्वरसंस्कार केले. स्वभाव आणि सामंजस्य यामुळे ते कलाकार आणि कलाप्रेमीमध्ये लोकप्रिय होते, असे राया कोरगांवकर म्हणाले.
गोव्यातील पंडित दिनकर पणशीकरांच्या शिष्य संप्रदाय खूप मोठा आहे. कुठल्याही अपेक्षेशिवाय त्यांनी गोमंतकीय विद्यार्थ्यांना संगीताची तालीम दिली. स्वतःच्या राहत्या जागेत, प्रसंगी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन संगीताचा प्रचार आणि प्रसार अत्यंत गांभिर्याने करण्याबरोबरच त्यांनी माणसेही जोडली. गोव्यातील शास्त्रीय संगीत क्षेत्राला आकारण्यात आणि साकारण्यात त्यांचा खूप मोठा वाटा असून या क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी त्यांना श्रद्धांजली व्यक्त करुन त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले.









