उत्तर प्रदेशात आश्वासनांची खैरात सुरुच, अखिलेश यादव, जयंत चौधरींचे धोरण
उत्तर प्रदेशात विविध राजकीय पक्षांकडून सध्या मतदारांवर आश्वासनांचा वर्षाव करण्यात येत आहे. सपने 300 युनिट वीज विनामूल्य देण्याचा वादा केला असून त्यापाठोपाठ आता ऊस शेतकऱयांचे थकित पैसे 15 दिवसांमध्ये देणार असल्याचे नवे आश्वासन दिले आहे. शुक्रवारी सपचे नेते अखिलेश यादव आणि रालोदचे जयंत चौधरी यांनी पश्चिम उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जाहीर सभेत ते दिले.
ही व्हर्चुअल सभा होती. दोन्ही नेत्यांनी संयुक्तपणे ती आयोजित केली होती. या सभेत अखिलेशसिंग यादव यांनी भाजप विरोधात हल्लाबोल केला. भाजपने गेल्या पाच वर्षांमध्ये एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. भाजप समाजात फुटीची बीजे पेरुन सत्तेवर टिकून राहू इच्छित आहे. मात्र सप आणि मित्रपक्षांचे राज्य आल्यास समाज हिताची कामे केली जातील. तसेच फूटपाडय़ांवर कारवाई केली जाईल. युवावर्ग आणि महिलांवर अधिक लक्ष दिले जाईल. रोजगारनिर्मितीवर भर दिला जाईल. समाजात शांतता निर्माण करणे आणि सौहार्दाचे वातावरण विविध समाज घटकांमध्ये रुजविणे हे आपल्या सरकारचे ध्येय राहील. भावनात्मक मुद्दय़ांपेक्षा जीवनाशी निगडीत मुद्दय़ांवर भर दिला जाईल, अशी अनेक आश्वासने यादव यांनी मतदारांना दिली. जयंत चौधरेनीही याचे समर्थन केले.
ऊस उत्पादक शेतकऱयांची संख्या पश्चिम उत्तर प्रदेशात अधिक आहे. त्यामुळे उसाला मिळणारा किमान दर हा महत्वाचा मुद्दा आहे. अनेक कारखान्यांकडे थकित पैसे राहिलेले असून ते 15 दिवसांमध्ये शेतकऱयांना दिले जातील या अखिलेश यादव यांच्या आश्वासनाच्या वास्तविकतेवर तज्ञांमध्ये दुमत आहे. अशीच आश्वासने विरोधी पक्षांनी मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, महाराष्ट्र इत्यादी राज्यांच्या विधानसभा निवडणुकांपूर्वी देण्यात आली होती. तथापी ती पूर्ण करता आली नाहीत. उत्तर प्रदेशची सध्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता या आश्वासनाचीही अशी गत होईल, अशी मतदाराचीही भावना असल्याचे दिसते.









