प्रतिनिधी /बेळगाव
पंत भक्तमंडळ व यमुनाक्का भजनी मंडळातर्फे श्री दत्त देवस्थान दर्शनाची सहल काढण्यात आली होती. या दरम्यान विविध धार्मिकस्थळांना भेटी देण्यात आल्या.
सहलीला समादेवी गल्ली येथील पंतवाडा येथून सुरुवात झाली. श्रीक्षेत्र औदुंबर येथे सहल पोहोचल्यानंतर सर्वांनी दर्शनाचा लाभ घेतला. यानंतर नृसिंहवाडी येथे दत्तात्रयांच्या निर्गुण पादुकांचे दर्शन घेतले. कुरुंदवाड येथील भैरेवाडी या गावी सध्या पंत महाराजांचा प्रचलित असलेला फोटो काढण्यात आला होता. तेथे एक भव्य मंदिर बांधण्यात आले आहे.
यानंतर खिद्रापूर शिवालयाला व त्यानंतर अक्कोळ येथील हनुमान मंदिराला भेट देण्यात आली. बाजूलाच पंतांचे शिष्य विष्णू अक्कोळकर यांचा टुमदार वाडा आहे. आदमापूर येथील बाळूमामांच्या समाधीस्थळाचे दर्शन झाल्यानंतर पंतभक्त बाळासाहेब पाटील यांनी सर्व भाविकांच्या जेवणाची सोय केली होती.









