आज पालखी सेवा : केवळ चारशे भाविकांच्या उपस्थित धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

वार्ताहर /सांबरा
श्रीक्षेत्र पंतबाळेकुंद्री येथील श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर यांच्या पुण्यतिथी उत्सवाला शुक्रवारी मोजक्याच भक्तांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. यावर्षीही पुण्यतिथी उत्सव सांकेतिक स्वरुपात व मोजक्याच भक्तांच्या उपस्थितीत करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार उत्सवाला प्रारंभ करण्यात आला.
सायंकाळी प्रेम ध्वजारोहण होऊन उत्सवाला प्रारंभ झाला. ध्वजारोहण प्रसंगी राजीव पंतबाळेकुंद्री, सुधीर पंतबाळेकुंद्री, डॉ. संजय पंत, अभिजीत पंत व विविध भागातून आलेले मोजेकच 400 भक्त हजर होते.
शनिवार दि. 23 रोजी पहाटे पाच पुण्यस्मरण कार्यक्रम होईल. त्यानंतर सकाळी साडेसात वाजता उत्सव मूर्ती व पादुकांची पालखी सेवा होईल. पालखी सेवेनंतर उत्सवमूर्ती व पादुकांची मंदिरामध्ये स्थापना करण्यात येईल. सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत पालखी सेवा होईल. दुपारी 2 वाजता महाप्रसाद होईल. तर सायंकाळी पाच ते सहा या वेळेत प्रेमानंद टिपरीचा कार्यक्रम होईल व परतीची पालखी सेवा सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत होईल. यावर्षी प्रशासनाकडून यात्रेला परवानगी न मिळाल्याने श्रीदत्त संस्थानने सांकेतिक स्वरुपात यात्रा करण्याचे ठरवले आहे. यासाठी भक्तांना पंतबाळेकुंद्री येथे येण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. वेगवेगळय़ा ठिकाणाहून आलेल्या केवळ मोजक्याच चारशे भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे. तसेच दरवर्षी तीन दिवस चालणारा हा उत्सव दोन दिवसात करण्यात येत आहे. तरी भक्तांनी आपापल्या घरी किंवा नजीकच्या पंत मंदिरात हा उत्सव साजरा करावा, असे आवाहन श्रीदत्त संस्थान पंतबाळेकुंद्री यांच्यावतीने करण्यात आले आहे.









