एकात्मता पुतळा पर्यटनाला प्रोत्साहनासाठी योजना
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गुजरातमधील केवाडिया येथे भारताचे पोलादी पुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘एकात्मता पुतळय़ा’पर्यंत जाण्यासाठी देशाच्या विविध भागांमधून 8 रेल्वेगाडय़ा सोडण्याची योजना रेल्वे विभागाने आखली आहे. पंतप्रधान मोदी या रेल्वेंना रविवारी हिरवा बावटा दाखविणार आहेत.
हा पुतळा असणारा केवडिया परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ बनविण्याची केंद्र सरकारची योजना आहे. या योजनेचा भाग म्हणून या रेल्वेगाडय़ा सुरू करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदी एका ब्रॉडगेज लाईनचेही उद्घाटन करणार आहेत. गुजरातमधील डभोई, चांदोड आणि केवडिया रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे. वाराणसी, दादर (मुंबई), अहमदाबाद, हजरत निजामुद्दिन (दिल्ली), रेवा, चेन्नई आणि प्रतापनगर या आठ रेल्वे स्थानकांमधून या गाडय़ा केवडियापर्यंत पोहचणार आहेत.









