नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिवर्षप्रमाणे या वर्षीही दिवाळी सीमेवरील सैनिकांसह साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. 2014 पासून त्यांनी या प्रथेचा प्रारंभ केला आहे. जम्मू-काश्मीरच्या नौशेरा आणि राजौरी सीमारेषांवर त्यांच्या वास्तव्यासाठी सेनेकडून सर्व सज्जता करण्यात येत आहे.
प्रत्येक वर्षी पंतप्रधान मोदी अशाच प्रकारे दिवाळी साजरी करतात. ते दिवाळीच्या दिवशी सीमेवरील सैनिकांना मिठाई आणि इतर वस्तू भेट देतात. राजौरी येथील सीमेवरील सैनिकांसह त्यांनी 2019 मध्ये दिवाळीचा आनंद घेतला होता. त्यांच्या सीमेवरील वास्तव्याच्या पार्श्वभूमीवर सैनिकांनी मोठय़ा प्रमाणात दहशतवाद्यांना शोधण्याचे कार्य हाती घेतले असून अनेक स्थानी धाडी टाकल्या आहेत. अशाच अभियानाच्या अंतर्गत पूंछमध्ये गेल्या दोन आठवडय़ांमध्ये काही सैनिक हुतात्मा झाले होते. तसेच 14 दहशतवाद्यांनाही कंठस्नान घालण्यात आले होते. सध्या लडाख येथील भारत-चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरही तणाव असून गेले दीड वर्ष दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांसमोर उभे आहेत.
अनेक सीमांवर दिवाळी
पंतप्रधान मोदी यांनी 2014 पासून आतापर्यंत प्रत्येक दिवाळी जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, पंजाब इत्यादी राज्यांमध्ये सीमेवर साजरी केली आहे. अत्यंत दुर्गम स्थानी आणि कष्टप्रद स्थितीत अहोरात्र देशाचे रक्षण करणाऱया सैनिकांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी ते त्यांच्यासह दिवाळी करतात.
केदारनाथ येथे जोरदार सज्जता
पंतप्रधान मोदी 5 नोव्हेंबरला उत्तराखंडमधील केदारनाथ या जगप्रसिद्ध तीर्थस्थळाचा दौरा करणार असून त्याची जोरदार सज्जता करण्यात येत आहे. ते केदारनाथ मंदिरात पूजाआर्चा आणि अभिषेक करणार असून त्यानंतर श्री आदी शंकराचार्यांच्या समाधी आणि पुतळय़ाचे अनावरण करणार आहेत.









