कोरोनाच्या प्रारंभापासून आतापर्यंतचा उच्चांक
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वातील भाजप-रालोआ सरकार सध्या लोकप्रियतेच्या उच्चांकी स्तरावर असल्याचा निष्कर्ष एका सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे. भारतात कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून आजवर त्यांच्या लोकप्रियतेत भरच पडली आहे. महागाई आणि बेरोजगारी हे चिंतेचे विषय असतानाही त्यांनी आपली लोकप्रियता वाढविली आहे, हे विषेश मानले जात आहे.
लोकल सर्कल्स या प्रसिद्ध सर्वेक्षण संस्थेने देशभरात घेतलेल्या सर्वेक्षणात केंद्र सरकारची लोकप्रियता 73 टक्क्यांपर्यंत पोहोचली असल्याचे स्पष्ट होत आहे. कोरोनाच्या दुसऱया आणि सर्वात तीव्र उद्रेकात ही लोकप्रियता 51 टक्क्यांपर्यंत घसरली होती. मात्र आता ती उच्चांकी पातळीवर असल्याचे दिसून येते.
कामगिरी अपेक्षेपेक्षाही अधिक
पंतप्रधान मोदी यांच्या सरकारने एकतर अपेक्षेइतकी किंवा अपेक्षेपेक्षाही चांगली कामगिरी केली आहे, असे मत नोंदविणाऱयांची संख्या सर्वेक्षण केलेल्यांपैकी 67 टक्के मतदारांनी व्यक्त केली आहे. 2020 मध्ये कोरोनाचा प्रारंभ झाला होता, तेव्हा असे मानणाऱयांची संख्या 67 टक्के होती. तर 2021 मध्ये कोरोनाच्या दुसऱया उद्रेकात हे प्रमाण 51 टक्क्यांपर्यंत खाली आले होते.
तिसऱया उद्रेकात सुधारणा
पंतप्रधान मोदी यांच्या सरकारने कोरोनाचा तिसरा उद्रेक उत्तमरित्या हाताळला आहे, असे मत बहुतेकांनी व्यक्त केले. तसेच बेरोजगारी कमी करण्यात या सरकारला यश आले आहे, असे मतही बहुसंख्य लोकांनी व्यक्त केले. कोरोना काळात यापूर्वी घेतलेल्या दोन सर्वेक्षणांमध्ये हे प्रमाण घटल्याचे दिसून आले होते. मात्र, आता ते पुन्हा वाढून कोरोनापूर्व काळाच्या पातळीपेक्षा जास्त आहे.
सर्वेक्षणाचे महत्वाचे निष्कर्ष
ड आपले आणि आपल्या कुटुंबाचे भवितव्य उज्ज्वल आहे, असे मत 73 टक्के मतदारांनी व्यक्त केले आहे. तर 23 टक्के लोकांचे मत याविरोधात आहे.
ड धार्मिक सलोखा राखण्यात सरकारला यश आले आहे असे मत 60 टक्के मतदारांनी व्यक्त केले आहे. तर 33 टक्के लोकांचे मत याविरोधात आहे.
ड भारतात व्यवसाय करण्यास अधिक अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे, असे मत 53 टक्के मतदारांचे आहे. 27 टक्के लोकांचे या विरोधात मत आहे.
ड प्रदूषण नियंत्रणात सरकारला अपयश आले आहे, असे मत 44 टक्के मतदारांनी व्यक्त केले आहे. तर या विरोधात 42 टक्के मतदारांचे मत आहे.









