नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 मे या दिवशी नेपाळचा दौरा करणार असून ते त्याच दिवशी बौद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून गौतम बुद्धाचे जन्मस्थान लुंबिनीला भेट देणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे. त्यांना नेपाळचे पंतप्रधान शेरबहादुर देऊबा यांनी विशेष आमंत्रण दिले आहे. 2014 पासूनचा हा पंतप्रधान मोदींचा पाचवा नेपाळ दौरा असेल.
लुंबिनी येथे ते प्रसिद्ध मायादेवी मंदिरात पूजाआर्चा करतील. लुंबिनी विकास न्यासाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते भाषण करणार आहेत. ते बौद्ध संस्कृती आणि वारसा केंद्राच्या वास्तूच्या शीलान्यास कार्यक्रमातही भाग घेतील. ही वास्तू दिल्लीतील बुद्धिस्ट कन्फेडरेशनच्या नेपाळमधील भूखंडावर साकारत आहे. त्यानंतर ते नेपाळचे पंतप्रधान शेरबहादुर देऊबा यांच्याशी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करतील.









