मुंबई/प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू आणि अखिल भारतीय रास्तभाव दुकान संघटनेचे उपाध्यक्ष प्रल्हाद मोदी यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील ठाकरे सरकारवर जीएसटीवरुन टीका केली. कोरोना आणि लॉकडाउनमुळे अडचणीत सापडलेल्या व्यापाऱ्यांची प्रल्हाद मोदी यांनी भेट घेतली.’ नरेंद्र मोदी असो की आणखी कुणी, त्यांना तुमचं ऐकावंच लागेल, असं म्हणत प्रल्हाद मोदी यांनी व्यापाऱ्यांना जीएसटी न भरण्याचा सल्ला दिला होता. तसेच त्यांनी आपले बंधू नरेंद्र मोदींवरही त्यांनी टीका केली आहे. “आम्ही सर्व भावंड मिळून चहा विकायचो. ज्यादिवशी ज्याचा नंबर असेल त्यांच्यावर चहा विकायची जबाबदारी असायची. पण चहावाला आम्ही नव्हतो, तर आमचे वडील होते. त्यामुळे आम्ही सर्व ‘चहावाल्याची मुलं’ आहोत, असं प्रल्हाद मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘चहावाला’ असं म्हटलं जातं, परंतु म्हणायचं असल्यास त्यांना चहावाल्याचा मुलगा म्हणा असंही त्यांनी नमूद केलं. उल्हासनगरमध्ये व्यापाऱ्यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना प्रल्हाद मोदी यांनी हे विधान केलं आहे. ‘आमच्या वडिलांनी चहा विकून आम्हा ६ भावंडांना मोठं केलं, पण पत्रकार नरेंद्र मोदींना ‘चहावाला’ म्हणतात; ही त्यांची चूक असून म्हणायचं असेल तर त्यांना ‘चहावल्याचा मुलगा’ म्हणा. चहा आम्ही सर्व भावंडांनी विकला, पण ज्याचा मुकुट मोठा, पत्रकार त्यालाच चालवतात’, असं ते म्हणाले.
नरेंद्र मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘चायवाला’ म्हणण्यापेक्षा ‘चायवाले का बेटा’ म्हणा, या त्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने टीका केली आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाना साधला आहे.









