नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांची येथे मंगळवारी चर्चा झाली आहे. ही माहिती बॅनर्जी यांनी नंतर दिली. राज्यातील कोरोना परिस्थिती, शेतकऱयांचे प्रश्न आणि इतर प्रश्नांवर चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांचा चार दिवसांचा दिल्ली दौरा मंगळवारपासून सुरू झाला आहे.
पश्चिम बंगाल राज्याला अधिक लसींची आवश्यकता आहे. तसेच केंद्र सरकारने राज्याच्या विकासाला अधिक आर्थिक साहाय्य करावे. राज्यात कोरोना परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. मात्र, लसीकरण वेगाने होण्याची आवश्यकता असल्याचा मुद्दा आपण मांडला असे त्यांनी स्पष्ट केले. पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच दिल्ली दौरा आहे. त्यांनी तृणमूल खासदारांचीही भेट घेतली.
काँगेस नेत्यांशी भेट
बॅनर्जी सर्व विरोधी पक्षांना भाजपविरोधात एकत्र करण्याच्या प्रयत्नात आहेत, असे बोलले जाते. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्यांनी मंगळवारी काही महत्वाच्या काँगेस नेत्यांची भेट घेतली. या नेत्यांमध्ये मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ, तसेच राज्यसभेतील नेते आनंद शर्मा आणि अभिषेक मनु सिंघवी यांचा समावेश आहे. त्या काँग्रेसच्या अस्थायी अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेणार आहेत. तृणमूल आणि काँगेस यांना एकमेकांच्या जवळ आणण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचेही काही सूत्रांचे म्हणणे आहे. तथापि, अद्याप या दोन्ही पक्षांनी या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाहीं. त्या दिल्लीत इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही भेटणार आहेत, अशी शक्यता व्यक्त केली जाते.
सोनिया गांधीची भूमिका सौम्य ?
सोनिया गांधी यांनी तृणमूल काँग्रेसबद्दल सौम्य भूमिका घेतली असून या पक्षाशी पुन्हा हातमिळवणी करण्याची तयारी दर्शविल्याचे काही सूत्रांचे म्हणणे आहे. तृणमूल काँगेस आणि काँगेस यांची काही वर्षांपूर्वी युती होती. तथापि, 2016 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ती तुटली. बॅनर्जी यांनी काँगेसला बाहेरचा रस्ता दाखविला. तेव्हापासून दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात निवडणुका लढविल्या आहेत.








