वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
तामिळनाडूत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ई.के. पलानिसामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. या भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा पलानिसामी यांनी केला आहे. आमच्या अनुमानानुसार तामिळनाडूत पुन्हा एकदा अण्णाद्रमुकचे सरकार स्थापन करणार असल्याचे ते म्हणाले.
प्रत्येक पक्ष विस्तारासंबंधी विचार करत असतो. प्रत्येक पक्षाची विशिष्ट विचारसरणी असते. परंतु विचारसरणी राजकारणापेक्षा वेगळी असल्याचे पलानिसामी यांनी म्हटले आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललितांच्या सहकारी व्ही.के. शशिकला यांच्या तुरुंगातून मुक्ततेनंतर त्यांना पक्षात सामील करण्यात येणार नसल्याचे पलानिसामी यांनी स्पष्ट केले आहे. टीटीव्ही दिनाकरन यांच्या पक्षाचे बहुतांश जण अण्णाद्रमुकमध्ये परतले आहेत. दिनाकरन यांच्या पक्षाला भवितव्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींना काही कार्यक्रमांच्या उद्घाटनासाठी आमंत्रित केल्याचे त्यांनी म्हटले आहे. तामिळनाडूच्य निवडणुकीकरता काँग्रेस आणि दमुकने यापूर्वीच आघाडी जाहीर केली आहे. तर सत्तारुढ अण्णाद्रमुक-भाजपच्या आघाडीवर लवकरच शिक्कामोर्तब होऊ शकते.









