बेंगळूर/प्रतिनिधी
देशात काही राज्यामध्ये पूर्ण लॉकडाऊन असूनही कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. देशात वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या चिंताजन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रुग्ण वाढत असलेल्या राज्यातील अधिकारी आणि मंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून तेथील परिस्थितीचा आढावा घेत आहेत. दरम्यान कर्नाटकातही पूर्ण लॉकडाऊन असूनही राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकातील विविध जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
पंतप्रधान मोदी मंगळवारी सकाळी कोविड -१९ चा सर्वाधिक संसर्ग असलेल्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधतील. मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पादेखील या परिषदेचा एक भाग असतील. राज्यातील १७ जिल्हाधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत. यामध्ये उत्तर कन्नड, हसन, बळ्ळारी, म्हैसूर, तुमकूर, कोलार, कोडगू, उडुपी, बेंगळूर शहरी आणि ग्रामीण, शिवमोगा, धारवाड, दक्षिण कन्नड, रायचूर, मंड्या, गुलबर्गा आणि चिकबळ्ळापूर जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून येथील कोरोना परिस्थितीबद्दल माहिती घेतील. सकाळी ११ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग होणार आहे.









