वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजेच 29 जुलै रोजी संध्याकाळी 4.30 वाजता देशाला राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या मुद्दय़ावरून देशाला संबोधित करणार आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त याच्या अंतर्गत केल्या जाणाऱया सुधारणांबद्दल मोदी बोलणार आहेत.
तसेच पंतप्रधान राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अंतर्गत निश्चित उद्देशांना पूर्ण करण्यासाठी अनेक मोहिमांचा शुभारंभ देखील करतील. याचबारेबर पंतप्रधान राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार करणारे तज्ञ, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनाही संबोधित करणार आहेत.
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 लागू करण्यासाठी आतापर्यंत उचलण्यात आलेल्या पावलांची माहिती पंतप्रधान देऊ शकतात. याचबरोबर नव्या शैक्षणिक सत्रासाठी लागू होणाऱया प्रकल्पांचा तपशील त्यांच्याकडून जाहीर केला जाऊ शकतो. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाला निश्चित कालमर्यादेत लागू करण्यावर लक्ष देणार असल्याचे केंद्रीय शिक्षणमंत्री म्हणून पदभार स्वीकारताना प्रधान यांनी म्हटले होते.
मागील वर्षी केंद्र सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरणाला मंजुरी दिली होती. नव्या राष्ट्रीय धोरणामुळे 1986 मध्ये लागू करण्यात आलेल्या शिक्षण धोरणाला पूर्णपणे बदलले असून नव्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. भारताला ज्ञान महाशक्तीचे स्वरुप मिळवून देण्याचा उद्देश नव्या शिक्षण धोरणाद्वारे बाळगण्यात आला आहे.









