बेंगळूर/प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या इंधन दरवाढीमुळे केंद्र सरकारविरोधात सर्वच स्तरातून टीका वाढत असताना कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारवर सर्वसामान्यांची लूट केल्याचा आरोप केला.
कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी इंधनाचे दर वाढल्याने नागरिकांच्या खरेदी सामर्थ्यावर परिणाम झाला आहे. “नरेंद्र मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलवरील कर वाढवून सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या प्रत्येक लिटरवर सध्या आकारली जाणारी उत्पादन शुल्क अनुक्रमे ३२.९८ रुपये आणि ३१.८३ रुपये आहे. यूपीए -२ च्या शेवटी पेट्रोलवर उत्पादन शुल्क अनुक्रमे ९.२१ रुपये आणि ३.४५ रुपये प्रतिलिटर होते, ”असे ते म्हणाले.
ट्वीटच्या मालिकेमध्ये ज्येष्ठ कॉंग्रेस नेते म्हणाले की, कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाल्याने पेट्रोलचे दर खाली यायला हवे होते, परंतु त्याऐवजी किंमती अनेक वेळा वाढल्या. “२०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ६,७९४ रुपये होते पण आता ते फक्त ४,००८ रुपये आहे. याला जबाबदार कोण आहे?” असे त्यांनी ट्विट केले आहे.









