प्रतिनिधी / मिरज
कृष्णाघाट येथील मार्कंडेश्वर मंदिराच्या उद्घाटनाबाबत काही मंडळींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार अशी चुकीची माहिती देऊन दिशाभूल करीत आहेत. त्यांचा आम्ही निषेध करीत आहोत. वास्तविक यामागे अर्थकारण आणि मंदिराची जागा हडप करण्याचा संबंधीतांचा डाव दिसतो. पंतप्रधान मोदींनी याबाबत कोणतेही आश्वासन दिलेले नाही. तरीही चुकीची माहिती देऊन काही लोक स्वार्थासाठी मोदींचे नांव घेत आहेत, असे स्पष्टीकरण भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे – म्हैसाळकर यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिले.
कृष्णाघाट येथे मार्कंडेश्वर मंदिराचा जिर्णोध्दार आणि नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भागवत सफ्ताह व अन्य धार्मिक सोहळे आयोजित करणार असल्याची माहिती कृष्णदेवानंद गिरी महाराज यांनी गेल्याच आठवडय़ात पत्रकार बैठकीत दिली होती. त्याचे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर तत्कालीन मिरज संस्थानचे सध्याचे वंशज गोपाळराजे पटवर्धन यांनी सदर सोहळ्यांना आणि जिर्णोध्दाराला विरोध दर्शविला होता. कृष्णा नदीकाठावरील मिरज घाट पाहिले श्रीमंत गंगाधरराव बाळासाहेब यांनी इ.स. 1787 च्या आसपास बांधला आहे. त्याचवेळी पटवर्धन राजघराण्याच्या वैयक्तीक वापरासाठी घाटावर वाडा बांधला. कृष्णाघाट हा सार्वजनिक वापरासाठी बांधला होता. तेव्हापासून तो अजूनही सार्वजनिक वापरात आहे. घाट, वाडा आणि मंदिरेची मालकी आमची मिरज संस्थानच्या सध्याच्या पटवर्धन घराण्याची आहे, असे गोपाळराव पटवर्धन यांनी स्पष्ट केले होते.
घाटासह मार्कंडेश्वर मंदिरावर दावा सांगण्याच्या उद्देशाने काही बेकायदेशीर घटकांनी मार्कंडेश्वर मंदिर जीर्णोद्धार करण्याची किंवा तिथल्या एखाद्या मंदिरातील पुनर्बांधणीची योजना आखण्याची घोषणा केली आहे. हे बेकायदेशीर आहे. कल्पित कथा सांगून मंदिर परिसर हा भगवान राम यांनी स्थापित केली होती आणि हा परिसर ऋषीं मार्कंडेयांचा आश्रम होता, अशी दंतकथा सांगितली जात आहे. त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे पटवर्धन यांनी स्पष्ट केले होते.
Previous Articleसोलापूर ग्रामीणमध्ये ४७२ तर शहरात ५१ कोरोनाबाधितांची भर
Next Article सांगली : आटपाडी अतिवृष्टी दुर्लक्षाने अधिकारी धारेवर








