संसदेत भाजप-आपचीच चर्चा, भगवंतसिंग मान यांचा सदस्यत्वाचा राजीनामा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उत्तरार्धाला सोमवारी प्रारंभ झाला आहे. कामकाजाची सुरवात होतानाच लोकसभेत भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान मोदींच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या. उत्तर प्रदेशसह चार राज्यांमध्ये भाजपला मिळालेल्या विजयामुळे या पक्षाचे सदस्य उत्साहात होते. पंजाबमध्ये मिळालेल्या यशामुळे आम आदमी पक्षाचे सदस्यही आनंदात होते. पंजाबचे मुख्यमंत्री होण्यासाठी या पक्षाचे लोकसभेचे खासदार भगवंतसिंग मान यांनी राजीनामा दिला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून जम्मू-काश्मीरचा 2022-23 साठीचा अर्थसंकल्प सादर केला गेला. राज्यसभा आणि लोकसभा येथे पहिल्या दिवशी फारसा गोंधळ न होता कामकाज पार पडले.
1.42 लाख कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प असून त्यात 11,832 कोटी रुपयांची तरतूद शिक्षणासाठी करण्यात आली आहे. पोलीस आणि गृह विभागासाठी 10,831.10 कोटी रुपये ठेवण्यात आले आहेत. अर्थसंकल्प राज्याच्या चहुमुखी विकासाचे उद्दिष्टय़ समोर ठेवून मांडण्यात आला आहे. राज्याची विशिष्ट परिस्थिती, सामाजिक वस्तुस्थिती आणि आवश्यकता यांना प्राधान्य देण्यात आले आहे, असे प्रतिपादन अर्थसंकल्प सादर करताना सीतारामन यांनी केले.
विविध माहिती
प्रश्नोत्तर काळात सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर संबंधित मंत्र्यांनी उत्तरे दिली. विमाने आणि विमानतळांच्या परिसरात भारतीय शास्त्रीय संगीत ऐकवण्याची कोणतीही सक्ती करण्यात आलेली नाही. तसेच सरकारने विमान कंपन्यांना यासंबंधी कोणतीही सूचनाही केलेली नाही, अशी माहिती नागरी विमानवाहतूक राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी लोकसभेत दिली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये विमाने आणि हेलिकॉप्टर्सना झालेल्या अपघातांमध्ये 42 सैनिक मृत्यूमुखी पडल्याचे स्पष्ट करण्यात आले. कोरोना काळात विमानवाहतूक व्यवसायाला मोठा फटका बसला होता. तथापि, आता तो उभारी घेत आहे, अशी माहिती देण्यात आली.
9 राज्यांमध्ये पेट्रोल महागच
केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी उत्पादन शुल्कात कपात केल्याने पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे 5 रुपये आणि 10 रुपये स्वस्त झाले होते. अनेक राज्यांनी आपल्या या उत्पादनावरील व्हॅट रद्द केल्याने ही किंमत या राज्यांमध्ये आणखी कमी झाली होती. तथापि, 9 राज्यांनी व्हॅट कमी केलेला नाही. या राज्यांमध्ये महाराष्ट्र आणि केरळचाही समावेश आहे, अशी माहिती राज्यसभेत देण्यात आली.
सरकारला घेरण्याची तयारी
युपेनमधून भारतीयांना परत आणणे आणि महागाई इत्यादी महत्वाच्या मुद्दय़ांवर सरकारला घेरण्याची तयारी काँगेस आणि इतर विरोधी पक्षांनी केली आहे. ही माहिती राज्यसभेतील काँगेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिली. युक्रेनप्रश्नी केंद्र सरकारने कुचराई केल्याने तेथील भारतीयांना त्रास सहन करावा लागला. भारताने वेळीच सावध होणे आवश्यक होते, असा आरोप विरोधकांनी केला होता.
‘गंगा’ बद्दल अभिनंदन
युद्धमान युक्रेन देशातून सर्व भारतीयांना सुरक्षित देशात परत आणण्याच्या कार्यामुळे संसदीय समितीने भारत सरकारची प्रशंसा केली आहे. वाहतूक, पर्यटन आणि संस्कृती विभागाच्या संसदीय समितीचे अध्यक्ष टी. जी. वेंकटेश यांनी सरकारने त्वरित केलेल्या कृतीबद्दल सरकारचे अभिनंदन केले. गंगा या नावाने चालविलेल्या अभियानाअंतर्गत ही कृती करण्यात येत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधन तेलाचे दर वाढलेले आहेत. सध्या ते काही प्रमाणात कमीही झाले आहेत. तरीही ते उच्च पातळीवरच आहेत. सरकार या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत असून अद्याप देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढविण्यासंबंधी निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र, जशी परिस्थिती असेल तसा निर्णय घेण्याची तयारी सरकारने केलेली आहे, असे लोकसभेत स्पष्ट केले गेले.









