ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 70 वा वाढदिवस. 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातच्या वडनगरमध्ये मोदींचा जन्म झाला. दरवर्षी मोदी आपल्या वाढदिवसानिमित्त गुजरातमधील गांधीनगर येथे जाऊन आई हिराबेन यांचे आशीर्वाद घेतात. आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवतात. मात्र, यंदा कोरोना आणि संसदेच्या हिवाळी अधिवेशनामुळे मोदींची ही परंपरा खंडित होणार आहे.
वाढदिवसानिमित्त ‘सेवा सप्ताह’
मोदींच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीकडून दरवर्षी सेवा सप्ताहाचे आयोजन केले जाते. यंदाही देशभरातील विविध राज्यात 14 सप्टेंबतपासून सेवा सप्ताह सुरू करण्यात आला आहे. दिव्यांगांना कृत्रिम अवयव आणि उपकरणे वाटप, गरीब बंधू-भगिनींना आवश्यकतेनुसार चष्मा वाटप, कोरोना परिस्थितीमध्ये रुग्णालयांमध्ये नियमांचे पालन करून फळांचे वितरण, रक्तदान शिबीर तसेच प्रत्येक जिल्ह्यातील 70 ठिकाणी स्वच्छतेचा कार्यक्रम, वृक्षारोपण यासारखे विविध उपक्रम या सप्ताहादरम्यान राबविण्यात येत आहेत.
दरम्यान, वाढदिवसानिमित्त मोदींना देश-विदेशातून शुभेच्छा मिळत आहेत. नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा, त्यांना चांगले आरोग्य लाभावे यासाठी मी प्रार्थना करतो. तसेच भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांचे संबंध अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करु’, असे शर्मा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
फिनलँडच्या पंतप्रधान सना मारीन यांनीही मोदी यांना पत्र लिहून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद,बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, काँग्रेस नेते राहुल गांधी, बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत यासारख्या दिग्गजांसह विविध राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी यांनी मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.









