प्रतिनिधी/ पणजी
पंतप्रधान नरेंद मोदी यांनी उत्तर गोव्याचे खासदार तथा केंद्रीय आयुषमंत्री, केद्रीय संरक्षण राज्यमंत्री, समस्त गोमंतकीयांचे लाडके श्रीपादभाऊ नाईक यांना काल रविवारी त्यांच्या वाढदिवसानिमित्त खास पत्र पाठवून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
‘मानवी जीवन ही इश्वराने दिलेली अमुल्य अशी भेट आहे. एक राजकीय नेता म्हणून आपले जीवन जनकल्याण आणि राष्ट्रसेवेत समर्पित करण्याची संधी मिळाली हे आपले सौभाग्य. आपण केंद्रीय मंत्रिमंडळात माझे एक सहकारी म्हणून जे उत्तम योगदान देत आहात, त्याचा मला मनापासून आनंद व अभिमान आहे. देश आणि समाजाच्या सबलीकरणासंदर्भातली आपली दृढ इच्छाशक्ती, सकारात्मक विचार आणि कर्तव्यनिष्ट कार्यशैली उल्लेखनीय आहे. आपण राष्ट्रनिर्माणच्या कार्यात नवऊर्जेसह निरंतर कार्यरत रहावे आणि आपल्या कार्याचा आलेख असाच उंचावत राहावा हिच माझी सदिच्छा. आपल्याला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभावे ही इश्वरचरणी प्रार्थना करतो’ असे पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छापत्रात नमूद केले आहे.
श्रीपादभाऊंनी काल रविवारी आपला वाढदिवस साधेपणाने साजरा केला. कोरोना महामारीमुळे लोकांनीही त्यांना प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा जिथे असेल तिथून शुभेच्छा व्यक्त केल्या. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रत्यक्ष भेटून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि दीर्घायुष्य चिंतीले.









