ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात आज ईद – उल – फित्रचा सण साजरा करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व मुस्लिम बांधव घरातच राहून ईद साजरी करत आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करत सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, ‘ईद – उल – फित्रच्या शुभेच्छा! या खास प्रसंगी करुणा, बंधुता आणि सौहार्दाची भावना आणखी वाढावी. प्रत्येकाने निरोगी आणि समृद्ध राहावे’, असे ही म्हटले आहे.
दरम्यान, ईद चे अतिशय महत्त्वाचे पर्व पाहता दर वर्षी या दिवशी असणारा उत्साह यावर्षी मात्र बऱ्याच अंशी शमल आहे. कोरोनाचे सावट आल्याने दिल्लीतील जामा मशीद ही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सर्व राज्यातील मुस्लिम धर्मियांकडून यापूर्वीच सर्व मुस्लिम बांधवांना ईद च्या निमित्ताने घराबाहेर न पडता घरात राहूनच या दिवसाची नमाज अदा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शिवाय सोशल डिस्टन्सिंगचंही पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









