खासदार उदयनराजे भोसले यांचे आश्वासन
प्रतिनिधी / खानापूर
खानापूर तालुका म. ए. समितीच्या शिष्टमंडळाने रविवार दि. 14 मार्च रोजी सातारा येथे खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन त्यांना सीमाप्रश्नासंदर्भात निवेदन सादर करून त्यांच्याबरोबर या प्रश्नी सविस्तर चर्चा केली. बहुभाषिक मराठी भाग कर्नाटकात डांबल्याने त्या सरकारकडून मराठी भाषा-संस्कृतीवर मोठा अन्याय केला जात आहे. यामुळे सीमाप्रश्न लवकरात लवकर सुटावा, यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी सीमाभागातील शिष्टमंडळाची भेट घडवून आणावी, अशी विनंती त्यामध्ये करण्यात आली आहे.
निवेदनाचा स्वीकार करून उदयनराजे भोसले यांनी आपण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांची तारीख घेऊन सीमाभागातील शिष्टमंडळाची या प्रश्नावर भेट घडवून आणू, अशी ग्वाही दिली. खानापूर तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष माजी आमदार दिगंबर पाटील यांनी त्यांना निवेदन सादर केले.
यावेळी त्यांच्या समवेत प्रकाश चव्हाण, प्रवीण पाटील (मुंबई), आबासाहेब दळवी, मुरलीधर पाटील, विवेक गिरी, रुक्माण्णा झुंजवाडकर आदी उपस्थित होते.









