प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊनच्या कालावधीत गोरगरीब जनतेला त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाच्यावतीने आवश्यक उपक्रम राबविण्यात येत आहेत. पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत मोफत गॅस कनेक्शन घेतलेल्या लाभार्थी ग्राहकांना तीन महिन्यांचे गॅस सिलिंडर मोफत देण्यात येत आहे. यासाठी बेळगाव जिल्हय़ासाठी 17 कोटीची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
बेळगाव जिल्हय़ात पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेचे 2 लाख 50 हजार ग्राहक असून प्रत्येक सिलिंडरमागे लाभार्थींच्या बँक खात्यात 745 रुपये जमा करण्यात आले असल्याची माहिती सुरेश अंगडी यांनी यावेळी दिली.
एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे सिलिंडर मोफत देण्यात येत असून लाभार्थींनी सिलिंडर तसेच आपल्या खात्यात जमा झालेली रक्कम घ्यावी. जिल्हय़ात अद्यापही 54 टक्के ग्राहकांनी बँक खात्यातील जमा झालेली रक्कम घेतली नसून ग्राहकांनी तात्काळ ही रक्कम घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत गॅस सिलिंडरचा पुरवठा करणाऱया लॉकडाऊन कालावधीत अपघात घडल्यास संबंधितांना गॅस कंपन्यांद्वारे 5 लाखाची मदत देण्यात येणार असून 2 लाखाचा विमाही उतरविण्यात आला असल्याचे यावेळी अंगडी यांनी सांगितले.
आम्ही का डोके बिघडून घ्यायचे?
जिल्हय़ातील क्वारंटाईन व्यवस्था तसेच सोशल डिस्टन्सबाबत पत्रकारांनी विचारले असता, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी म्हणाले, प्रशासन, डॉक्टर, लोकप्रतिनिधी आदींनी वारंवार सूचना करूनही त्याचे पालन काही जणांकडून करण्यात येत नाही. यामुळे त्यांच्या मृत्यूस तेच जबाबदार राहतील, आम्ही का डोके बिघडून घ्यायचे, असा प्रतिप्रश्न मंत्री अंगडी यांनी यावेळी केला.









