बीसीसीआय, रवि शास्त्री, कोहली, रहाणे यांनी मानले आभार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताने अलीकडेच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱयात अनेक अडचणीवर मात करीत मालिकाविजय मिळविल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’मध्ये कौतुक केले. त्याबद्दल संघाचे प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी पंतप्रधानांचे आभार मानले असून त्यांच्या कौतुकाच्या शब्दांनी भविष्यात याहून सरस कामगिरी करण्याची संघाला प्रेरणा मिळणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱयात भारतीय संघाला खेळाडूंच्या दुखापतींनी हैराण केले होते. शेवटच्या कसोटीत तर अकरा फिट खेळाडू मिळतात का, अशी स्थिती निर्माण झाली होती. अशा स्थितीतही भारतीय संघाने जिगरबाज प्रदर्शन करून सगळय़ा अडचणींवर मात करीत तिसरी कसोटी अनिर्णीत राखली तर चौथी कसोटी जिंकून मालिकाविजय मिळविला. अथक मेहनत व सांघिक बळाच्या जोरावर संघाने मिळविलेले हे यश प्रेरणादायक असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले. ‘तुमच्या या कौतुकाच्या शब्दांनी टीम इंडिया आणखी बळकट झाली असून कठीण परिस्थितीतही यश मिळविण्याची प्रेरणा त्यातून त्यांना मिळणार आहे. धन्यवाद मोदीजी,’ अशा शब्दांत ट्विट करून शास्त्री यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.
शास्त्री यांच्याप्रमाणेच अजिंक्य रहाणे, कर्णधार विराट कोहली, बीसीसीआय यांनीही पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. तिरंगा उंचावण्यासाठी जे काही करता येणे शक्य आहे, ते आपला संघ निश्चितच करेल. तुम्ही केलेल्या कौतुकाने खेळाडूंचा उत्साह नक्कीच वाढेल, असे बीसीसीआयने म्हणत त्यांचे आभार मानले आहेत.









