वयाच्या 13 वर्षी दोन्ही हात गमाविणाऱया मालविका यांच्याकडून ट्विट : सामाजिक भूमिकेत बदल घडवून आणणाऱया महिलांचा गौरव
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद मोदी यांनी रविवारी आंतरराष्ट्रीय महिला दिनी स्वतःची समाजमाध्यम खाती 7 महिलांच्या हाती सोपविली आहेत. नारीशक्तीच्या भावना आणि कौशल्याला भारतवासीय सलाम करतात, 7 महिला माझ्या समाजमाध्यम खात्यांद्वारे स्वतःच्या जीवनासंबंधी विचार मांडतील आणि जनतेशी संवाद साधतील असे मोदींनी रविवारी सकाळी जाहीर केले. तसेच त्यांनी भाजप नेत्या वसुंधरा राजे यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
मालविका अय्यर

मोदींचे समाजमाध्यम हाताळणाऱया महिलांमध्ये मालविका अय्यर यांचा प्रामुख्याने समावेश आहे. मालविका यांनी वयाच्या 13 व्या वर्षी बॉम्बस्फोटात स्वतःचे दोन्ही हात गमाविले होते. हार मानणे कुठलाच पर्याय नाही असा ट्विट करणाऱया मालविका दिव्यांगांच्या अधिकारांसाठी लढत आहेत. तसेच त्यांनी सामाजिक कार्यात पीएचडी प्राप्त केली आहे
स्नेहा मोहनदास

पंतप्रधान मोदींचे समाजमाध्यम खाते सर्वप्रथम सांभाळणाऱया चेन्नईच्या रहिवासी स्नेहा मोहनदास यांनी स्वतःच्या फूड फॉर थॉट मोहिमेसंबंधी माहिती दिली आहे. फूड बँक चालविणाऱया स्नेहा यांनी ट्विटरवर एक चित्रफित प्रसारित केली आहे. 2015 मध्ये त्यांनी फुडबॅक इंडिया उपक्रमास प्रारंभ केलेल्या स्नेहा यांनी भुकमुक्त भारताचे स्वप्न जोपासले आहे. त्यांच्या या मोहिमेशी शेकडो लोक जोडले गेले आहेत.
आरिफा जान

श्रीनगरच्या रहिवासी आरिफा यांनी जम्मू-काश्मीरच्या हस्तकलेला नवी ओळख मिळवून दिली आहे. हस्तकलेच्या क्षेत्रात कामगारांना योग्य मोबदला मिळत नसल्याने त्याची ओळख संपुष्टात येत असल्याचे तिच्या निदर्शनास आले होते. तिने 28 महिलांचा गट निर्माण करून काश्मीरच्या पारंपरिक पश्मीना शाल, दरी आणि अन्य उत्पादनांची निर्मिती सुरू केली. 7 वर्षांपासून हस्तकलेच्या क्षेत्रात कार्यरत आरिफाने नव्या युवक-युवतींना ही कला शिकविली आहे.
कल्पना रमेश

“योद्धा व्हा, पण दुसऱया प्रकारचे. तुम्ही कधी पाण्याच्या टंचाईबद्दल विचार केला आहात का? प्रत्येक जण पाणी वाचवून स्वतःच्या मुलांचे भविष्य सुरक्षित करू शकतो’’ असे हैदराबादच्या कल्पना रमेश यांनी मोदींच्या ट्विटर खात्यावर नमूद केले आहे. स्थापत्यशास्त्रात पदवीधर असलेल्या कल्पना यांना विवाहानंतर हैदराबादमध्ये वास्तव्यास आल्यावर पाण्याच्या टंचाईची जाणीव झाली. स्थापत्यशास्त्राची पार्श्वभूमी असल्याने त्यांनी पाण्याचा एक थेंबही वाया जाणार नाही अशा प्रकारच्या घराची निर्मिती केली. याचबरोबर रेनवॉटर हार्वेस्टिंगसंबंधी जागरुकता निर्माण केली आहे.
विजया पवार

महाराष्ट्रातील विजया पवार ग्रामीण भागांमध्ये भटक्या समुदायाची हस्तकला टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. बालपणापासूनच या कलेशी जोडली गेली होती, पण विवाहानंतर पतीने ती शिकविल्याचे विजया सांगतात. 2004 मध्ये त्यांनी एका स्वयंसेवी संस्थेची नोंदणी करत महिलांना प्रशिक्षण देण्यास प्रारंभ केला. भारत सरकारच्या वस्त्राsद्योग मंत्रालयाच्या योजनेंतर्गत 682 महिलांना 5 वर्षांपर्यंत त्यांनी प्रशिक्षण दिले आहे.
कलावती देवी

लक्ष्यप्राप्तीचे ध्येय असल्यास मागे वळून पाहिले जाऊ नये असे कानपूरच्या कलावती देवी यांनी म्हटले आहे. त्यांनी स्वच्छतेसाठी लोकांमध्ये जागरुकता निर्माण केली आहे. त्यांच्या वस्तीत शौचालय तसेच स्वच्छ पेयजलाची सुविधा नव्हती. घरोघरी जात कलावती देवी यांनी शौचालयासंधी जागरुकता निर्माण केली आणि वर्षभर भिक्षा मागून पैसे जमा केले होते. या रकमेतून त्यांनी 55 शौचालयांची निर्मिती करण्यासह 11 हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या दोन टाक्या बसविल्या आहेत.
वीणा देवी

बिहारच्या वीणा देवी घरातच मशरुमची शेती करून आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी होत आहेत. तसेच अन्य महिलांनाही आर्थिक दृष्टय़ा बळकट करत आहेत. वीणा देवी यांनी विकसित केलेल्या पद्धतीतून पलंग मावणार इतक्या जागतेही मशरूम पीक घेतले जाऊ शकते. या उपक्रमाकरता त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला आहे.









