ऑनलाईन टीम / मुंबई :
विधानसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केल्याप्रकरणी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी बिनशर्त माफी मागितली आहे. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे हक्कभगांचे चॅलेंजही स्वीकारले आहे.
राज्यातील वीजजोडणी आणि कनेक्शन कापण्याच्या मुद्यावरून लक्षवेधी सुरू असताना ऊर्जमंत्री नितीन राऊत यांनी पंतप्रधानांनी नागरिकांच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचं विधान केलं. त्यावर फडणवीसांनी आक्षेप घेतल्यानंतर भास्कर जाधव यांनी हस्तक्षेप करत पंतप्रधानांची नक्कल केली. यावेळी सभागृहात गदारोळ झाला. त्यानंतर भाजपने भास्कर जाधव यांच्या निलंबनाची मागणी केली होती. दरम्यान, मी जे काही बोललो ते असंसदीय नव्हते. मात्र, त्यावेळी जो अंगविक्षेप केला, त्याबद्दल सभागृह अध्यक्षांच्या सूचनेनुसार मी बिनशर्त माफी मागत आहे, असे म्हणत जाधव यांनी माफी मागितली. तसेच देवेंद्र फडणवीस हक्कभंग आणणार असतील तर मी तयार आहे, असेही भास्कर जाधव यांनी सांगितले.
लक्षवेधी सुरू असताना नितीन राऊत यांनी पंतप्रधान मोदी शेतकऱयांच्या खात्यात 15 लाख जमा करणार हेते, त्याचे काय झाले अशी विचारणा केली. यावेळी आक्रमक झालेल्या फडणवीस यांनी राऊतांना हे वाक्य खोटे आहे. खरे असेल आणून दाखवावे, असे आव्हान दिले. यावर भास्कर जाधव यांनी हस्तक्षेप करत ‘काला धन लाने का के नहीं लाने का? तो लाने का.. लाने का तो कहाँ रखने का? यू ही रखने का’ असं म्हणत मोदींची नक्कल केली.








