स्वामी विवेकानंद चौकातील घटना , पन्नास लाखांचे नुकसान
वार्ताहर / पंढरपूर
पंढरपूर शहरातील नवीपेठ येथील स्वामी विवेकानंद चौकातील दुकानांना शॉर्टसर्कीटमुळे लागलेल्या आगीत चार दुकाने जळून खाक झाली आहेत. ही घटना रविवारी पहाटे चारच्या दरम्यान घडली. यामध्ये 49 लाख 64 हजार रुपयांचे नुकसान झाले असून घटनेचा पंचनामा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
शहरातील स्वामी विवेकानंद चौक, शहा पेट्रोलपंपाशेजारील दुकानांना पहाटे चारच्या दरम्यान भीषण आग लागली. अग्निशाम दल, पोलिस व नगरपालिकेच्या कर्मचाऱयांनी आग आटोक्यात आणली. यामध्ये कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही. यात शुभम कृषी केंद्र, राजेंद्र विष्णु कोरके यांच्या दुकानाचे 15 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
राधे मोबाईल शॉपीचे शामराव वामन मदने यांच्या दुकानाचे 8 लाख 64 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दोस्ती मोबाईल शॉपीचे संदीप रामहरी पाडोळे यांच्या दुकानाचे19 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाले. अपूर्वा इलेक्ट्रॉनिक्सचे रमेश इरया स्वामी यांच्या दुकानाचे 6 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. पुढील तपास शहर पोलिस ठाण्याचे पो.स.ई.घुले हे करीत आहेत.