पंढरपूर / प्रतिनिधी
येथील तालुका पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील मोक्का मधील 2 आरोपी 4 वर्षापासून फरार होते. या आरोपीच्या तालुका पोलिसानी जेरबंद केले असल्याची माहिती तालुक पोलिस निरिक्षक किरण अवचर यांनी दिली आहे.
पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी अधिक्षक पदाचा कार्यभार घेतल्यानंतर गंभीर गुन्हे करणारे रेकाॅर्डवरील दरोडेखोर व मोक्का मधील आरोपी यांना जेरबंद करण्याकरीता मार्गदर्शन करुन सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या पथकातील सपोनि खरात, सपोनि ओलेकर, पोउनि वसमाळे यांनी सदरची कारवाई करुन मोक्का मधील आरोपिना जेरबंद करण्यात आले.
पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे अभिलेखावरील दरोडेखोर व मोक्का मधील पाहीजे असलेले आरोपी नामे शत्रुघ्न अनंता काळे, भारत अनंता काळे व त्याचे इतर साथीदार यांचा सन 2017 पासुन शोध घेतला असता ते आतापर्यंत मिळुन येत नव्हते. मात्र 2 नोहेंबर रोजी सकाळी 09.00 वा च्या सुमारास पारधीवस्ती पुळुज ता पंढरपुर या ठिकाणी आरेापी नामे शत्रुघ्न अनंता काळे व भारत अनंता काळे यांनी त्यांचे नातेवाईक यांस कु-हाड व दगडाने जबर जखमी करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबाबत माहीती मिळाली. त्यानूसार पुळुजमध्ये पारधी रस्ता येथे पाठलाग करुन आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
सदर आरेापींवर सोलापुर ग्रामिण मध्ये सदर आरोपींचेवर कुर्डुवाडी पोलीस ठाणेस देखील गुन्हे दाखल आहेत. तसेच त्यांचेवर महाराष्ट्र राज्यात इतर ठिकाणी देखील खुन, दरोडा, जबरी चोरी यांसारखे गुन्हे दाखल आहेत, तसेच महाराष्ट्र राज्याव्यतिरिक्त इतर राज्यात देखील त्यांचेवर खुनासारखे गंभीर गुन्हे नोंद आहेत.









