कुरुंदवाड / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील अब्दुललाटच्या महिलेची फसवणूक करणाऱ्या पंढरपूरच्या भोंदूबाबाला अटक करण्यात आली आहे. तुमच्या मुलावर करणी झाली आहे, तुमच्या आईला व मुलाला रक्ताच्या उलट्या होतील याचा बंदोबस्त करावा लागेल. यासाठी पैसे आणि दागिने लागतील, अशी बतावणी करून मिरज रोड पंढरपूर येथील पृथ्वीराज जाधव या भोंदूबाबाने 1 लाख 35 हजार रोख रक्कम व 1 लाख 34 हजार 400 रुपयांचे दागिने घेऊन ज्योत्स्ना पालकर या महिलेची फसवणूक केली होती.
पोलिसांनी कारवाई करत भोंदूबाबाला अटक करून त्याच्याकडून सोने व रोख रक्कम हस्तगत केली आहे. आज न्यायालयात हजर केले असता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांनी दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, आरोपी पृथ्वीराज यशवंत जाधव पंढरपूर रोड मिरज याने 8 मे 2019 ते 15 ऑगस्ट 2019 या काळात अब्दुललाट येथील श्रीमती ज्योत्स्ना पालकर यांच्या घरी जाऊन मी देवर्षीचे काम करतो असे सांगून तुझ्या मुलाला नोकरी नाही. त्यामुळे आपण तणावाखाली आहे असे सांगितले. तुमच्या मुलावर कोणीतरी करणी केली आहे असे सांगत ती काढण्यासाठी पाच हजार रुपये घेतले. त्यानंतर जाधव याने ज्योत्स्ना पालकर यांचे आई व भावाला त्रास होत आहे. तुमच्या मुलावर मोठी करणी केली आहे. ती काढण्यासाठी तुमच्या जवळचे सोन्याचे दागिने द्या, असे सांगून ज्योत्स्नाकडून आठ मे रोजी दोन पिळाच्या अंगठ्या, सहा ग्रॅमची चेन घेतली.
त्यानंतर 15 ऑगस्ट रोजी तुमच्या आईला व मुलाला रक्ताच्या उलट्या होतील यासाठी बंधन करायचे आहे. त्याकरीता तुमच्याकडील सोने व पैसे द्या बंधन झाल्यावर तुमचे पैसे दागिने परत देतो, असे सांगून दीड तोळ्याचा लक्ष्मीहार, साडेतीन तोळ्याची डबल साखळी चेन, तीन ग्रॅम सोन्याचे टॉप्स, तीन ग्रॅम सोन्याच्या बॉक्स रिंगा, पाच ग्रॅम सोन्याच्या रिंगा, अर्धा तोळा सोन्याचा टिक्का, अडीच ग्रॅमची कानातील सोन्याची फुले, दोन ग्रॅमची सोन्याची बुगडी, दोन ग्रॅमच्या दोन अंगठ्या, दोन पिळाच्या अंगठ्या, सहा ग्रॅमची चेन असे 1 लाख 34 हजार 400 रुपये किंमतीचे दागिने व रोख रक्कम 1 लाख35 हजार रुपये घेऊन फसवणूक केली. याप्रकरणी ज्योत्स्ना पालकर यांनी येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
या फसवणूक प्रकरणी गडिंग्लज विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, इचलकरंजी विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी बाबुराव महामुनी, येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल अविनाश मुंगसे, पोलीस कॉन्स्टेबल अमित प्रधान, पोलीस कॉन्स्टेबल सागर खाडे यांच्या पथकाने आरोपी पृथ्वीराज यशवंत जाधव याला अटक करून त्याच्याकडून सोने व रोख रक्क्कम जप्त केली. त्याला येथील न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









