वृत्तसंस्था/ मुंबई
रविवारी भारतीय क्रिकेट संघाने पुण्यात इंग्लंडचा 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत पराभव केल्यानंतर सलामीचा फलंदाज रोहित शर्माचे आयपीएल स्पर्धेसाठी मुंबईत आगमन झाले. आता तो इंडियन्स संघाच्या सराव शिबिरात दाखल होईल. या संघाचे नेतृत्व शर्मा करीत आहे. त्याचप्रमाणे हार्दिक व कृणाल पंडय़ा, सूर्यकुमार यादव हेही मुंबई इंडियन्स संघात दाखल झाले आहेत.
भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये दिसत आहे. इंग्लंड संघाला आपल्या अडीच महिन्यांच्या भारताच्या दौऱयामध्ये कसोटी, वनडे आणि टी-20 मालिका गमवाव्या लागल्या. या तिन्ही मालिकेत शर्माच्या फलंदाजीमध्ये सातत्य दिसून आले आहे. 9 एप्रिलपासून सुरू होणाऱया आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाला पुन्हा एकदा आयपीएल चषक मिळवून देण्यासाठी रोहित शर्मा सज्ज झाला आहे. सोमवारी मुंबई इंडियन्स संघामध्ये पंडय़ा बंधूं, सूर्यकुमार यादव दाखल झाले आहेत. 9 एप्रिलला विद्यमान विजेता मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेजर्स बेंगळूर यांच्यात सलामीचा सामना होईल. इंग्लंडविरूद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत रोहित शर्माने 90 धावा जमविल्या तर इंग्लंडविरूद्धच्या टी-20 मालिकेत सूर्यकुमार यादवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या मालिकेतील चौथ्या आणि पाचव्या सामन्यात सूर्यकुमार यादवने चांगली फलंदाजी केल्याने त्याला वनडे मालिकेसाठी निवडण्यात आले होते पण त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. रविवारच्या तिसऱया आणि शेवटच्या थरारक वनडे सामन्यात हार्दिक पंडय़ाने 64 तर कृणाल पंडय़ाने समयोचित फलंदाजी केली. कृणालने वनडे मालिकेत आपले पदार्पण करताना पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकविले होते.









