हृदयविकाराच्या धक्क्यामुळे निवासस्थानीच अखेरचा श्वास
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
प्रसिद्ध कथ्थक नर्तक पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांचे सोमवारी दिल्लीतील राहत्या निवासस्थानी निधन झाले. वयाच्या 83 व्या वषी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बिरजू महाराज यांना 1983 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि कालिदास सन्मानही प्राप्त झाला होता. तसेच बनारस हिंदू विद्यापीठ आणि खैरागड विद्यापीठानेही बिरजू महाराजांना मानद डॉक्टरेट बहाल केली होती.
लखनौ घराण्यातील बिरजू महाराज यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1938 रोजी लखनौ येथे झाला. त्यांचे खरे नाव पंडित बृजमोहन मिश्रा असे होते. कथ्थक नर्तक असण्यासोबतच ते शास्त्रीय गायकही होते. बिरजू महाराज यांचे वडील आणि गुरु आच्छान महाराज, काका शंभू महाराज आणि लच्छू महाराज हेदेखील प्रसिद्ध कथ्थक नर्तक होते.
नातीने दिली माहिती
गेल्या महिन्यापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. रविवारी रात्री मी त्यांना माझ्या हाताने जेवण खाऊ दिले. त्यानंतर त्यांना कॉफीदेखील तयार करून दिली. ते रात्री जेवण झाल्यानंतर गाण्याच्या भेंडय़ा खेळत होते. त्यांना अचानक श्वास घ्यायला त्रास झाला. त्यानंतर हृदयविकाराचा धक्का बसल्याची माहिती पंडित बिरजू महाराज यांची नात रागिणी महाराज हिने दिली.
मान्यवरांकडून शोकभावना
पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेक सेलिब्रिटी आणि नेत्यांनी सोशल मीडियावर शोकभावना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करत पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाने खूप दुःख झाले. त्यांनी भारतीय नृत्यकलेची जगभरात विशेष ओळख निर्माण केली होती, असे म्हटले आहे.









