अध्याय अकरावा
मुक्ताच्या ठिकाणी कोणत्याही गोष्टीचा आग्रह म्हणून नसतो. जो अतिशय आग्रही असतो तो खरोखर बद्ध होय. भगवंतांनी उद्धवाला जी मुक्तांची लक्षणे सांगितली तीच साधकांनी साध्य करायची असतात. सिद्धाला ती सहजगत्या प्राप्त असतात, आणि साधकाला ती दृढतर निष्टेने साध्य करून घ्यावी लागतात. विशेष म्हणजे जे, स्वतः शास्त्रज्ञ व पंडित म्हणून अभिमान मिरविणारे असतात त्यांना, मुक्तांच्या पंक्तीतून दूर लोटलेले असते.
जो साधन न करता कोरडाच शास्त्राचा अभिमान बाळगतो आणि रात्रंदिवस धनाची व मानाची इच्छा करतो, तो आत्मज्ञानाच्या जवळपासही फिरकू शकत नाही. आम्ही मोठे कर्मकुशल याज्ञिक आहोत, शास्त्रसंपन्न व वेदपाठक आहोत असे म्हणतात किंवा निरंतर जे द्रव्याच्या इच्छेने लोलुप झालेले असतात, त्यांनाही हे सुख प्राप्त होणे नाही. भगवंत म्हणाले, उद्धवा ! त्यांनी शास्त्र सम्पन्न होण्यासाठी जे कष्ट केले असतात, ते सर्व फुकट जातात. त्याबद्दलही खरा विचार आता सांगतो ऐक. वेद पठण करून वेदशास्त्रांचा अर्थ शिकून महा पंडित होतो, जिव्हेवर सदासर्वकाल चारही वेद मूर्तिमंत उभे असतात. स्वरयुक्त संहिता, पदे, क्रम, अरण, ब्राह्मण, सूत्र, निरुक्त, जटापाठ, ध्वजस्थ इत्यादि सवर्णक म्हणावयास
येतात.
आयुर्वेद, धनुर्वेद, गायनशास्त्रांतील सारे भेद जाणणारा, काव्यनाटकातील उत्तम मर्मज्ञ, वेद व उपवेद जाणणारा, व्याकरणामध्ये मोठा निष्णात, सांख्यशास्त्र, योगशास्त्र, तर्कशास्त्र ह्यांत पारंगत, वैशेषिक शास्त्रही माहीत, यज्ञापर्यंत मोठा कर्ममीमांसा जाणणारा, वेदांताचे विवरण करण्यामध्ये बृहस्पति, वार्तिकापर्यंत शास्त्रांची माहिती, प्रस्थानत्रयी हात जोडून पुढे उभी शिल्पशास्त्रांत अतिशय निष्णात, पाकशास्त्रात पटाईत, रत्नपरीक्षा उत्तम, अश्वपरीक्षाही तशीच आगमोक्त मंत्रतंत्रांत तयारी, शैवदीक्षेतील, वैष्णवदीक्षेतील सार जाणलेले, सौर, शाक्त, जारण-मारण इत्यादि मंत्रतंत्रांत कोणी हात धरणारा नाही, कामशास्त्रात निष्णात, संगीतशास्त्रातही प्रवीण, कविता करण्यामध्ये अत्यंत कुशल, राजकारणामध्येही पटु, निघंटु अगदी तोंडपाठ, गारुडी चमत्कार करावयाला येतातच, अत्यंत प्रसिद्ध पंचाक्षरी, नामांकित वैद्य आणि रसायनशास्त्रवेत्ता औषधी तयार कराव्यात तर त्यानेच ! भूतभविष्यादि ज्योतिष जाणणारा, अमरकोशादि शब्दकोश आणि अठरा पुराणे मुखोद्गत, प्रश्नावलीही पहावयास येते, स्वाध्याय तर सांगावा असा त्यानेच, इतिहासाची प्रकरणे सारी मुखोद्गत, गर्भाची लक्षणे तर बिनचूक, शब्दव्युत्पत्तीचे ज्ञान मोठे, साधकबाधक प्रमाणे सारी ठाऊक, समयसूचकता तर पाठीशी उभी, बोलण्याच्या कामात तर दुसरा बृहस्पतीचा अवतार, ब्रह्मज्ञान म्हणजे अगदी तळहातातील आवळय़ाप्रमाणे प्रांजळ बोलणारा पण आत्मानुभवामध्ये मात्र आंधळा! कारण त्यांतील जिव्हाळा त्याला माहीत नसतो. ज्याप्रमाणे मोराच्या अंगभर अगदी डोळय़ासारखीच पिसे भरलेली असतात पण त्यांना दृष्टि नसल्यामुळे ती जशी सारीच आंधळी, त्याप्रमाणेच विद्वानांचीही दशा होते.
ज्या स्तनांतून दूध निघते, त्याच थानाला गोचिडही चिकटून बसते. मूर्खपणाने ते रक्तच पिऊन राहतात ! त्याप्रमाणेच असले विद्वान् विषयालाच झोंबत असतात ! गोचिडाच्या तोंडात दूध शिरू लागले तर ते सोडून देऊन तो रक्त तेवढेच ग्रहण करतो, त्याप्रमाणे विद्वानही ज्ञान विकून विषय मागतात.
माशी ही सुगंधी चंदनाला सोडून देऊन मोठय़ा आवडीने घाणीवर जाऊन बसते, त्याप्रमाणे पंडित लोकही आत्मज्ञानाला सोडून विषयाशीच झोंबत बसतात. बेडूक हे कमलाच्या मकरंदाजवळ असून चिखलच खात बसतात, त्याप्रमाणे पंडितही आत्मज्ञानाला सोडून देऊन विषयांतच लुब्ध होतात. अद्वैतमताची सिद्धता करून ते ज्ञान विकण्याकरिता देशांतराला जातात. मूर्ख लोक ज्ञात्यांचा उपहास करतात तरी ते सन्मानाची इच्छा करतातच ! ज्ञाता ब्रह्मनिरूपण सांगू लागला म्हणजे सात्त्वीक लोकांचे मन परमार्थाकडे वळते पण वक्ता मात्र द्रव्याचीच इच्छा करतो.
क्रमशः







