वृत्तसंस्था/ अबुधाबी
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत शनिवारी येथे होणाऱया सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाची कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध सत्त्वपरीक्षाच होणार आहे. स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी पंजाबला विजयासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागेल. सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3.30 वाजता प्रारंभ होईल.
गुरुवारच्या सामन्यात सनरायझर्स हैद्राबादने पंजाबचा 69 धावांनी दणदणीत पराभव केला असल्याने पंजाब संघावर शनिवारच्या सामन्यात विजयासाठी अधिक दडपण राहील. या स्पर्धेत आतापर्यंत कोलकाता संघाने प्रभावी अष्टपैलू कामगिरी केली असल्याने पंजाबला कोलकाताचे मोठे आव्हान राहील. पंजाब संघाने आतापर्यंत या स्पर्धेत एकमेव सामना जिंकला असून पाच सामने गमावले आहेत. स्पर्धेच्या गुणतक्त्यात पंजाबचा संघ केवळ दोन गुणांसह शेवटच्या स्थानावर आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाने आतापर्यंत तीन सामने जिंकत सहा गुणांसह गुणतक्त्यात चौथे स्थान मिळविले आहे. कोलकाता संघाची कामगिरी प्रत्येक सामन्यात सुधारत असून त्यांनी आतापर्यंत दोन वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. या संघातील सलामीचा फलंदाज शुभमन गिलने आपल्या कामगिरीत सातत्य राखले आहे. या संघातील आणखी एक फलंदाज राहुल त्रिपाठीने दोन दिवसांपूर्वी झालेल्या सामन्यात चेन्नईविरुद्ध 81 धावांची आक्रमक खेळी केली होती. कोलकाता संघातील अष्टपैलू सुनील नरेन सूर मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मधल्या फळीमध्ये मॉर्गनची उपस्थिती कोलकाता संघाला अधिक आत्मविश्वास देणारी ठरली आहे. आंदे रस्सेल हा या संघातील आणखी एक उपयुक्त खेळाडू आहे. दिनेश कार्तिकच्या कप्तानपदाची कसोटी शनिवारच्या सामन्यात पुन्हा एकदा लागलेली पहावयास मिळेल. मात्र, दिनेशला फलंदाजीचा सूर मिळालेला नाही. कोलकाता संघाकडे कमलेश नागरकोटी, शिवम मावी, पॅट कमिन्स हे वेगवान गोलंदाज असून सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती यांच्यावर फिरकीची जबाबदारी राहील.
पंजाब संघाला पुन्हा सलामीची जोडी के. एल. राहुल आणि मयांक अगरवाल यांच्या कामगिरीवर विसंबून रहावे लागेल. या संघातील विंडीजचा सलामीचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल याला अन्नातून विषबाधा झाल्याने तो यापूर्वीच्या सामन्यात खेळू शकला नाही. पण आता शनिवारच्या सामन्यात त्याचे मैदानावर आगमन होण्याची शक्मयता वर्तविली जात आहे. मॅक्सवेलच्या जागी गेलला संधी मिळण्याची शक्मयता वर्तविली जात आहे.









