वृत्तसंस्था/ चंदीगढ
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या हॉकीमध्ये कास्यपदक मिळविणाऱया हॉकीपटूंचा तसेच अन्य पंजाबमधील दहा क्रीडापटूंचा गुरुवारी राज्य शासनातर्फे खास गौरव करण्यात आला. या गौरव समारंभामध्ये पंजाब शासनातर्फे 28.36 कोटी रुपयांची रक्कम बक्षिसादाखल वाटण्यात आली. तसेच पात्रतेनुसार पदक विजेत्यांना शासकीय नोकरी देण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली.
भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रित सिंग याला पोलीस खात्यातील नोकरीमध्ये बढती देण्यात आली आहे. ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंच्या सत्कार समारंभाला पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग उपस्थित होते. हॉकी कर्णधार मनप्रित सिंग याला पोलीस खात्यात बढती देण्यात आली आहे. आता तो पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत राहील. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेक प्रकारात भारताला एकमेव सुवर्णपदक मिळवून देणाऱया नीरज चोप्राला पंजाब शासनातर्फे 2.51 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. तथापि, पंजाब शासनातर्फे आयोजिलेल्या या समारंभाला नीरज चोप्रा उपस्थित राहू शकला नाही. भारतीय पुरुष हॉकी संघातील दहा हॉकीपटू पंजाबचे आहेत. कर्णधार मनप्रित सिंग, हरमनप्रित सिंग, वरुण कुमार, मनदीप सिंग, समशेर सिंग, रुपिंदरपाल सिंग, हार्दिक सिंग, सिमरनजित सिंग, गुरुजंत सिंग आणि दिलप्रित सिंग यांना प्रत्येकी 2.5 कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला.
भारतीय महिला हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पहिल्यांदाच उपांत्यफेरीपर्यंत मजल मारली होती. दरम्यान, भारतीय महिला हॉकी संघाचे कास्यपदक थोडक्मयात हुकले. या संघातील पंजाबच्या रिना खोकर, गुरजित कौर, तसेच थाळीफेकमध्ये सहावे स्थान मिळविणारी कमलप्रित कौर यांना पंजाब शासनातर्फे प्रत्येकी 50 लाख रुपये देण्यात आले. भारतीय पुरुष हॉकी संघातील कृष्णन पाठक यालाही 50 लाख रुपये पंजाब शासनातर्फे देण्यात आले. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारात सहभागी झालेल्या पंजाबच्या इतर दहा क्रीडापटूंना पंजाब शासनातर्फे प्रत्येकी 21 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. मुष्टियोद्धी सिमरनजित कौर, नेमबाज अंजुम मोदगिल, अंगदवीर सिंग, तेजिंदरपाल सिंग तूर, गुरुप्रित सिंग, तसेच टोकियो पॅराऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणाऱया पालक कोहलीचा यामध्ये समावेश आहे. या सर्व क्रीडापटूंच्या बँक खात्यामध्ये ही बक्षिसाची रक्कम ऑनलाईनद्वारे पंजाब शासनातर्फे थेट जमा करण्यात आली आहे. या समारंभाला पंजाबचे क्रीडामंत्री राणा गुरमितसिंग सोधी, आंतरराष्ट्रीय गोल्फपटू जीवमिल्खा सिंग, त्याचप्रमाणे पंजाबच्या क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. पंजाबमधील इच्छुक क्रीडापटूंना चंदीगढ पोलीस खात्यामध्ये भरती होण्याची ऑफर पंजाबचे राज्यपाल व्ही. पी. सिंग बडनोरी यांनी दिली आहे.









