चंदिगढ / वृत्तसंस्था
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी रविवारी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. रविवारी दुपारी 4.30 वाजता झालेल्या शपथविधी सोहळय़ात 15 नवे मंत्री पंजाब सरकारमध्ये सामील झाले. चन्नी यांनी 6 नवोदितांना संधी दिली असून कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या सरकारमध्ये मंत्री असलेले 9 जुने चेहरे मंत्रिमंडळात कायम ठेवण्यात आले आहेत. मात्र, कॅप्टन यांच्या निकटवर्तियांपैकी सहा जणांना डच्चू देण्यात आला. मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांच्यासह सुखजिंदर रंधावा आणि ओपी सोनी या दोघांनी उपमुख्यमंत्री म्हणून यापूर्वीच शपथ घेतली आहे.
‘कॅप्टन टीम’मधील ब्रह्म मोहिंद्रा, मनप्रीत बादल, तृप्त राजिंदर बाजवा, अरुणा चौधरी, सुख सरकारिया, राणा गुरजीत, रझिया सुल्ताना, विजयेंद्र सिंगला, भारत भूषण आशु आदी 9 जणांना चन्नी यांच्या मंत्रिमंडळातही समाविष्ट करण्यात आले. त्यांनी सुरुवातीला शपथ घेतली. त्यानंतर पहिल्यांदा मंत्री बनत असलेल्या रणदीप नाभा, राजकुमार वेर्का, संगत सिंग गिलजियन, परगट सिंग, अमरिंदर सिंग राजा वडिंग, गुरकीरत कोटली यांनी शपथ घेतली. पंजाबमध्ये चार महिन्यांनी विधानसभा निवडणुका होणार असल्याने पक्षनेतृत्वाने दलितांना आकर्षून घेण्यासाठी मंत्रिमंडळ विस्तारातही जातीय समीकरणाची खेळी खेळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.









