चंदीगढ / वृत्तसंस्था
पंजाब पोलिसांच्या बँड पथकाला लग्नसमारंभांमध्ये बँड वाजविण्याची अनुमती देण्यात आली आहे. पोलिसांच्या बँड पथकाचा दर तासाला 7 हजार रुपये असा निर्धारीत करण्यात आला आहे. मात्र, सरकारी कर्मचाऱयांच्या खासगी कार्यक्रमासाठी हा दर ताशी 5 हजार रुपये आहे. तशा प्रकारचे सर्क्युलरही काढण्यात आले असून पोलिसांनी बुकींगही सुरा केले आहे. याकामी मुक्तसर जिल्हय़ाचे एसएसपी हरमनदीपसिंग यांनी पुढाकार घेतला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सर्वसाधारणतः स्वातंत्र्य दिन, गणतंत्र दिन, सरकारी कार्यक्रम इत्यादींमध्ये पोलिसांच्या बँड पथकाला बोलाविले जाते. तथापि. लग्नांसारख्या खासगी कार्यक्रमांमध्ये पोलिसांचा बँड ही संकल्पना नव्याने सुरु करण्यात आली असून ती टीकेचा विषयही बनली आहे. खासगी कार्यक्रमात आपली अशा प्रकारची सेवा देणे हे पोलीस दलासाठी कमीपणाचे आहे, अशीही प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.









