माझा अन् दोआबामध्ये राष्ट्रीय नेते असणार निरीक्षक ः पक्षश्रेष्ठींना देणार अहवाल
पंजाब निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षशेष्ठी केवळ राज्यातील नेत्यांवर निर्भर असणार नाही. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही यावर नजर राहणार आहे. सोनिया गांधींनी याकरता मालवा, माझा आणि दोआबामध्ये निरीक्षक नियुक्त पेले आहेत. हे निरीक्षक तेथील नेत्यांच्या हालचालींवर नजर ठेवून त्याचा अहवाल काँग्रेस पक्षश्रेष्ठींना पाठविणार आहेत. यासंबंधी काँग्रेसकडून 4 नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा स्तरावरही निरीक्षक
काँग्रेसकडून यापूर्वी जिल्हा स्तरावरही निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. हे निरीक्षक जिल्हा पातळीवर काँग्रेसच्या कार्यक्रम अन् प्रचारावर नजर ठेवत आहेत. जिल्हय़ातील काँग्रेस समर्थकांना एकजूट करण्याचे काम या निरीक्षकांकडून करण्यात येत आहे.
अंतर्गत कलहामुळे चिंता
पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत कलहामुळे पक्षश्रेष्ठींची चिंता वाढली आहे. नवज्योत सिंह सिद्धू आणि मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांच्यात पूर्वीच मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारावरून संघर्ष सुरू आहे. त्यात तिकीटवाटपामुळे निर्माण झालेल्या नाराजीची भर पडली आहे. अनेक मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे बंडखोर नेते उभे राहिले आहेत. यात बस्सी पठाना मतदारसंघात मुख्यमंत्री चन्नी यांचे बंधू डॉ. मनोहर सिंह, समराला मतदारसंघात विद्यमान आमदार अमरीक ढिल्लो यांचा समावेश असून ते अपक्ष म्हणून उभे राहिले आहेत. कपूरथळा मतदारसंघात मंत्री राणा गुरजीत यांनी स्वतःचे पुत्र राणा इंद्रप्रताप यांना सुल्तानपूर लोधी मतदारसंघातून उभे करण्याची तयारी केली आहे. काँग्रेस नेते नवजोत चीमा यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसला सुमारे 15 मतदारसंघांमध्ये बंडखोरीला तोंड द्यावे लागत आहे.









