चंदीगड / वृत्तसंस्था
बारावीच्या विद्यार्थ्यांना विनामूल्य स्मार्टफोन देण्याचा निर्णय पंजाब सरकारने घेतला आहे. सरकारी महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी हे आश्वासन देण्यात आले होते. या निर्णयाचे क्रियान्वयनही त्वरित सुरू करण्यात आले असून बुधवारी राज्याच्या विविध विभागांच्या अधिकाऱयांकडून फोन्सचे वाटप सुरू करण्यात आले. ग्रामीण भागांमधील 1 लाख 10 हजार विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर एकंदर राज्यभरात या योजनेच्या लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या 1 लाख 74 हजार 15 इतकी आहे. राज्याचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी योजनेचा प्रारंभ केला.